१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी!
By admin | Published: April 9, 2016 01:39 AM2016-04-09T01:39:08+5:302016-04-09T01:39:08+5:30
अकोला जिल्हाधिका-यांचा आदेश : नळ योजना विशेष दुरुस्ती.
अकोला: जिल्ह्यातील २२ गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ४ एप्रिल रोजी दिला. ८0 लाख ५३ हजार १११ रुपयांच्या या कामांमध्ये तीन तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि १५ नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या तीन तालुक्यांतील १८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजना विशेष दुरुस्ती व तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तीन तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि १५ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी ८0 लाख ५३ हजार १११ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याबाबत लक्ष देण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. त्यामुळे संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.