प्रशासकीय-पडीक प्रभागांचे नियोजन कागदावर
By admin | Published: April 27, 2017 01:18 AM2017-04-27T01:18:56+5:302017-04-27T01:18:56+5:30
क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता विभाग, आरोग्य निरीक्षकांचा ताळमेळ जमेना
अकोला : महापालिकेच्या सभागृहात कचऱ्याच्या समस्येवरून घसे कोरडे करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये घाण व कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले आहेत. दैनंदिन साफसफाईसाठी प्रशासनाने पडीक आणि प्रशासकीय प्रभागांचे केलेले नियोजन केवळ कागदावर असल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता विभाग आणि आरोग्य निरीक्षकांचा आपसात कवडीचाही ताळमेळ जमत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेची निवडणूक आटोपल्यानंतर शहरातील साफसफाईच्या कामांना गती येईल, अशी अकोलेकरांना अपेक्षा होती. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचनांचे स्वागत करून प्रशासनाने पडीक प्रभागांची संकल्पना कायम ठेवली. मनपा क्षेत्राची हद्दवाढ होऊन नव्याने प्रभाग पुनर्रचना केली असता २० प्रभागांची निर्मिती करण्यात आली. यापैकी दहा प्रभाग प्रशासकीय तर दहा प्रभागांचा समावेश पडीकमध्ये करण्यात आला. मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत ७४८ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासकीय प्रभागांसाठी करण्यात आली असून, पडीक प्रभागांसाठी ६०० खासगी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. शहर साफसफाईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा लवाजमा असताना ठिकठिकाणी घाणीचे व कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाचे नियोजन केवळ कागदोपत्री दिसत असून, त्याचा नाहक त्रास अकोलेकरांना सहन करावा लागत आहे.
आरोग्य निरीक्षकांचे लाड कशासाठी?
मनपाच्या आस्थपनेवरील सफाई कर्मचाऱ्यांनी दररोज आठ तास काम करणे गरजेचे आहे. पडीक असो वा प्रशासकीय प्रभागात दैनंदिन साफसफाई होते किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची आहे. शहरातील घाणीचे चित्र पाहता आरोग्य निरीक्षक त्यांचे काम कितपत प्रामाणिकपणे निभावतात, हे दिसून येते. असे असताना प्रशासन आरोग्य निरीक्षकांचे लाड का पुरवते, असा सवाल उपस्थित होतो.
पडीक प्रभागात नगरसेवकांचे तोंडावर बोट
प्रभागांच्या भौगोलिक क्षेत्रफळात वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेवकांनी पडीक प्रभागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली होती. पडीक प्रभागांसाठी ६०० खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यातील बहुतांश प्रभागांचा कंत्राट नगरसेवकांच्या चेलेचपाट्यांनी घेतला. नगरसेवकांच्या कार्यशैलीचा पूर्वानुभव लक्षात घेता, कागदोपत्री एका प्रभागात ६० कर्मचारी दाखवून प्रत्यक्षात २०-२५ कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतेची कामे करण्याकडे कल आहे. परिणामी, पडीक प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाण व कचरा साचला असताना, नगरसेवकांनी मात्र तोंडावर बोट ठेवल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
क्षेत्रीय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
आरोग्य निरीक्षक दैनंदिन साफसफाईचा अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपवितात. मुख्य रस्ते असो वा अंतर्गत रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणांवर साचलेला कचरा पाहता क्षेत्रीय अधिकारी आरोग्य निरीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची एकूणच भूमिका पाहता ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
प्रभागांचे वर्गीकरण केले पण...
साफसफाईचे काम चोख व्हावे, यासाठी प्रशासनाने पडीक आणि प्रशासकीय प्रभागांचे वर्गीकरण केले. प्रशासकीय प्रभागांमध्ये आस्थापनेवरील सफाई कर्मचारी अवघ्या तास-दोन तासांत रस्त्यांची थातूर-मातूर झाडपूस करून कामावरून पळ काढतात. काही बहाद्दर हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करून घरी निघून जात असल्याचे प्रकार घडत असताना, संबंधित क्षेत्रीय अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षकांनी डोळ्यांवर पट्टी बांधली की काय, अशी शंका निर्माण होत आहे.