२२४ ग्रामपंचायतींंमध्ये प्रशासकराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:22 AM2020-08-24T10:22:20+5:302020-08-24T10:22:40+5:30
सोमवारपासून जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाच वर्षांचा कालावधी संपणाऱ्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) २१ आॅगस्ट रोजी दिला. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी २४ ते ३१ आॅगस्टदरम्यान संपत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सद्यस्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार नसल्याने, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाच वर्षांचा कार्यकाळ संपणाºया २२४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांना २१ आॅगस्ट रोजी दिला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिलेला प्रशासक नियुक्तींचा आदेश जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत २२ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाºयांना निर्गमित करण्यात आला.
त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, २४ आॅगस्टपासून ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे.
विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ग्रां.पं. चे प्रशासक!
राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांव्यतिरिक्त अधिकाºयांची ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील पंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आणि जिल्हा परिषद शाळांमधील काही केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.