कोरोना संकटात अडकली वसतिगृहांतील प्रवेश प्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:02 AM2020-06-28T10:02:26+5:302020-06-28T10:02:43+5:30
शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटात समाजकल्याण विभागाच्या राज्यातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया अडकली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वसतिगृहांमधील प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा केली जात आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यातील शाळा व महाविद्यालये अद्याप सुरू झाले नाही, तसेच समाजकल्याण विभागांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या नाही. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजकल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटात शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समाजकल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.
अकोल्यातील तीन वसतिगृहांमध्ये ‘क्वारंटीन वार्ड’!
समाजकल्याण विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात मागासवर्गीय मुला-मुलींचे आठ शासकीय वसतिगृह आहेत. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, अकोला शहरातील तीन शासकीय वसतिगृह ‘क्वारंटीन वार्ड’ साठी अधिग्रहित करण्यात आले आहेत. त्यानुसार या वसतिगृहांमध्ये सद्यस्थितीत ‘क्वारंटीन वार्ड ’ कार्यान्वित आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर शासकीय वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झाल्या नाहीत, त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
-अमोल यावलीकर
सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.