४२ दिवसांनंतर घ्यावा लागेल काेविशिल्डचा दुसरा डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:19+5:302021-05-13T04:18:19+5:30
केंद्र शासनाने काेविन ॲपमध्ये बदल केला असून आता ४२ दिवसांचा कालावधी संपल्यानंतरच काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस घेता येणार आहे़ ...
केंद्र शासनाने काेविन ॲपमध्ये बदल केला असून आता ४२ दिवसांचा कालावधी संपल्यानंतरच काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस घेता येणार आहे़ दरम्यान, या नवीन नियमावलीमुळे बुधवारी लसीकरण केंद्रांमध्ये काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक तास ताटकळत उभे रहावे लागल्यानंतर घरी परत यावे लागले़
संसर्गजन्य काेराेना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला आहे़ नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे केलेच्या दुर्लक्षाचे परिणाम समाेर आले आहेत़ काेराेना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली असून शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे़ अनेक ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची समस्या असल्यामुळे उपचारादरम्यान अनेक रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत़ एकूणच ही बिकट परिस्थिती लक्षात घेता लस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत़ लसींचा उपलब्ध साठा व लस घेणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता लसीकरण केंद्रांमध्ये गाेंधळाची स्थिती निर्माण हाेत आहे़ यापूर्वी काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिन लसीचा पहिला डाेस घेणाऱ्या नागरिकांवर दुसऱ्या डाेससाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली असून यातील अनेक नागरिकांचा दुसऱ्या डाेसचा कालावधी संपण्याच्या मार्गावर आहे़ ही बाब ध्यानात घेता मंगळवारी रात्री केंद्र शासनाच्या काेविन ॲपमध्ये बदल करण्यात आला असून ४२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित नागरिकांना काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस घेता येणार आहे़
काेव्हॅक्सिनमध्ये बदल नाही !
काेव्हॅक्सिन लसीचा दुसरा डाेस घेण्याच्या कालावधीसंदर्भात शासनाकडून तूर्तास काेणतीही नवीन सूचना अथवा निर्देश प्राप्त नाहीत़ त्यामुळे ज्या नागरिकांना काेव्हॅक्सिन लसीचा दुसरा डाेस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ठरावीक लसीकरण केंद्रांत ती लस उपलब्ध केली जाणार आहे़
ज्येष्ठांची गैरसाेय टाळता येइल !
लसीचा निर्माण हाेणारा तुटवडा पाहता शासनाने दुसरा डाेस घेण्यासाठी दिलेल्या निकषांकडे दुर्लक्ष करून लस मिळणार नाही, या विचारातून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत़ त्यामुळे काेविशिल्डच्या दुसऱ्या डाेससंदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमामुळे लसीकरण केंद्रात ज्येष्ठांची गैरसाेय टाळण्यास मदतच हाेणार आहे़