९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 10:53 AM2022-01-29T10:53:18+5:302022-01-29T10:53:49+5:30
ST Strike Akola : ९० दिवस बंद असलेली प्रवासी वाहतूक आता २९ बसेसच्या माध्यमातून पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संप साेडून अनेक कर्मचारी कामावर : प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न
अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संपाची काेंडी फुटत नसली तरी काही कर्मचारी संप साेडून कामावर परतत असल्याने प्रवासी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. संपामुळे तब्बल ९० दिवस बंद असलेली प्रवासी वाहतूक आता २९ बसेसच्या माध्यमातून पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटीचे राज्यभरातील कर्मचारी गत अडीच महिन्यांपेक्षाही अधिक कालावधीपासून संपावर आहेत. अकोला विभागांतर्गत येणाऱ्या अकोला व वाशिम जिल्ह्यातही १,९००पेक्षा अधिक कर्मचारी संपावर आहेत. या संपावर तोडगा निघत नसल्याने हळूहळू काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये काही चालक व वाहक रुजू झाल्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
काेणत्या आगारातून किती बस
अकाेला आगार - एकूण बस धावू लागल्या
अकोला क्र. १ - ४० - ०५
अकोला क्र. २ - ०० - १५
अकोट - ४७ - ०६
तेल्हारा - २८ - ०१
मूर्तिजापूर - १९ - ०३
एकूण बसेस १८५, रस्त्यावर २८
संप कायमच, कर्मचारी ठाम
अकोला विभागात जवळपास १,९००पेक्षा अधिक कर्मचारी अजूनही संपात सहभागी असल्याची माहिती आहे. हे सर्व कर्मचारी संपावर ठाम असून, निलंबन, बडतर्फी याला न घाबरता जाेपर्यंत विलिनीकरण नाही, ताेपर्यंत माघार नाही, असा संकल्प या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
तेल्हारा आगारातून केवळ एक बस
जिल्ह्याच्या पाचही आगारांतून हळूहळू प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी तेल्हारा आगारातून केवळ एकच बस रस्त्यावर आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आगारात संपकरी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागाची मदार खासगी वाहनांवरच
एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असला तरी प्रामुख्याने माेठ्या शहरांतर्गत व तालुकास्तरावरील बस सुरू करण्याला प्राधान्य दिले जात असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीची मदार खासगी वाहनांवरच आहे.
अकोला जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये आतापर्यंत जवळपास १६०पेक्षा अधिक कर्मचारी रुजू झाले आहेत. या आगारांमधून आता जवळपास २९ बसेस रस्त्यावर धावत असून, या बसेसच्या विविध ठिकाणी फेऱ्या होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. लवकरच प्रवासी सेवा पूर्ववत हाेईल, अशी आशा एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.