अखेर अकोला शहरातील मृत डुकरांचे केले ‘पोस्टमॉर्टम’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:11 AM2017-12-05T02:11:58+5:302017-12-05T02:13:55+5:30
नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात मृत डुकरांच्या संख्येत अचानक वाढ होण्यासोबतच त्यांची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट न लावता, शहरात उघड्यावरच फेकून दिले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
शहरातील गुरे-ढोरे, मोकाट श्वान तसेच डुकरांची कलेवरे उचलून महापालिका प्रशासनाने त्यांची डम्पिंग ग्राउंडवर अथवा शहराबाहेर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी तसेच प्रभागात नियुक्त केलेले आरोग्य निरीक्षक निष्क्रिय असल्यामुळे की काय, मृत जनावरांना चक्क शहरी भागात उघड्यावर फेकून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दोन-तीन दिवसांनंतर मृत जनावरांमधून निघणार्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने डुकरांची संख्या जास्त असल्याने आणि स्वाइन फ्लूचा आजार डुकरांमुळे पसरत असल्याची सर्वसामान्यांची धारणा असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील काही विशिष्ट प्रभागांमध्ये उघड्यावर मृत डुकरांची कलेवरे आढळून आल्याच्या वृत्ताची महापौर विजय अग्रवाल यांनी गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा खरपूस समाचार घेतला. यासंदर्भात सोमवारी महापौर अग्रवाल यांनी त्यांच्या दालनात वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, मलेरिया विभाग, स्वच्छता व आरोग्य विभाग तसेच कोंडवाडा विभागाची तातडीने बैठक बोलावली. जनावर कोणतेही असो, ते मृत पावल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता उघड्यावर फेकून दिले जात असल्याच्या प्रकारावर महापौर अग्रवाल यांनी संताप व्यक्त केला. शहराबाहेर दूर मृत जनावरांसाठी खोल खड्डा करून त्यामध्ये मीठ, चुना टाकून जमिनीत गाडण्याची सूचना महापौरांनी उपस्थित अधिकार्यांना केली. बैठकीला उपमहापौर वैशाली शेळके, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक शशी चोपडे, मनोज गायकवाड तसेच संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मृत डुकरांचे केले शवविच्छेदन
डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे होतो, हे जाणून घेण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. तडकाफडकी जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. नीता गोडबोले, डॉ. नम्रता बाभूळकर, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. प्रवीण चेडे यांनी शवविच्छेदन केले असून, नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत.
‘स्वाइन फ्लू’ वर काथ्याकूट
स्वाइन फ्लूची लागण नेमकी कशामुळे होते, यावर आरोग्य यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही. पुण्यात डुकराच्या माध्यमातून ‘एच-१,एन-१’ विषाणुमुळे माणसाला रोगाची लागण झाल्याचे आढळून आले होते. वैद्यकीय क्षेत्रात संबोधल्या जाणार्या ‘एच-१,एन-१ एन्फ्लूएन्झा फ्लू’हा संसर्गजन्य आजार मानला जातो. सर्वसामान्यांमध्ये अद्यापही डुकरांच्या माध्यमातून ‘स्वाइन फ्लू’ पसरत असल्याचा समज आहे. याविषयावर वैद्यकीय क्षेत्रात चांगलाच काथ्याकूट सुरू झाला आहे.
शहरात मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मृत जनावरांना सर्रास उघड्यावर फेकले जात असल्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, ज्या प्रभागात असे प्रकार आढळून येतील, तेथील आरोग्य निरीक्षकांची खैर नाही, हे नक्की. शहरात फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-विजय अग्रवाल, महापौर
---फोटो- ५ सीटीसीएल- 0४, 0५---