अखेर मोर्णा पात्रातील जलकुंभी काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:08 PM2019-04-14T13:08:15+5:302019-04-14T13:08:32+5:30
अकोला: स्थानिक मोर्णा नदी पात्रातील जलकुंभी काढण्यास अखेर महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, काही भागातील जलकुंभी काढल्या गेल्याचे चित्र दिसत आहे.
अकोला: स्थानिक मोर्णा नदी पात्रातील जलकुंभी काढण्यास अखेर महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, काही भागातील जलकुंभी काढल्या गेल्याचे चित्र दिसत आहे. पात्रातील जलकुंभी पूर्णपणे काढल्या गेल्यास अकोलेकरांना डासांच्या त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. जेसीबी आणि मजुरांची चमू लावून महापालिकेने जलकुंभी काढण्यास सुरुवात केली आहे.
मागील उन्हाळ्यात अकोल्यातील जलकुंभी काढण्यासाठी मनपा आयुक्तांनी उशीर केला होता. दरम्यान, अकोल्याचे तत्कालीन वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी समाजसेवी संस्थांना हाताशी धरून जलकुंभी काढण्यास सुरुवात केली. अकोल्यातील सामाजिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नामुळे मोर्णा स्वच्छ तर झाली; मात्र पाण्डेय वादात सापडले. त्यानंतर पुन्हा यंदा जलकुंभीने डोके वर काढले. गावंडे यांच्या आश्रमापासून तर गडंकीपर्यंतच्या शहराला विभागणाऱ्या मोर्णा नदीच्या पात्रात जलकुंभी विस्तारली गेली आहे. मोठ्या प्रमाणात जलकुंभी पसरल्याने शहारातील प्रत्येक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीकाठी राहणारे आणि इतर नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. मनपा आयुक्तांकडे यासंदर्भात अनेक तक्रारी सातत्याने गेल्यानंतर कुठे जलकुंभी काढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या १० एप्रिलपासून जलकुंभी काढली जात असून, टप्प्या-टप्प्याने काम सुरू आहे. मजूर आणि जेसीबीच्या साहाय्याने ही जलकुंभी काढल्या जात आहे.