चतारीनंतर पिंपळखुटा येथे १२ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:36+5:302021-03-22T04:16:36+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी चतारी येथे सातजणांचा कोरोना अहवाल ...
खेट्री : पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी चतारी येथे सातजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता पिंपळखुटा येथील १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पिंपळखुटा व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ मार्च रोजी पिंपळखुटा येथे रॅपिड तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास ४९ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एक आरोग्य कर्मचारी व पिंपळखुटा येथील ११ ग्रामस्थ असा एकूण १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या गावासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा संसर्ग वाढू नये, यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पिंपळखुटा येथे शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाही या शुक्रवारीही आठवडा बाजार भरला होता. या बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता, आठवडा बाजार भरला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.