प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू बाळही दगावले, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच गेली ‘लक्ष्मी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 05:05 AM2017-10-21T05:05:30+5:302017-10-21T05:05:37+5:30
प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली.
अकोला : प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली. नवजात मुलीचाही विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव-माणेगाव येथील विवाहिता सोनू भीमराव आगरकर (२३) यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवार, १९ आॅक्टोबर रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आणले. येथे दाखल झाल्यानंतर रात्री ९.२० वाजताच्या दरम्यान सोनू आगरकर यांनी एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयातील एका परिसेविकेच्या निगराणीखाली सामान्य प्रसुती झाली. त्यानंतर मात्र सोनू आगरकर यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी अत्यवस्थ झालेल्या सोनू वाघमारे यांना सर्वोपचार रुग्णालयाकडे ‘रेफर’ केले; परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला.
कमी दिवसाच्या असलेल्या बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्यात आले; परंतु शुक्रवारी सकाळी सोनू आगरकर यांच्या नवजात मुलीचाही मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी दिवाळीची सुटी असल्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे एकट्या परिसेविकेला सोनू यांची प्र्रसूती करावी लागली. यावेळी डॉक्टर हजर असते, तर हा प्रकार घडला नसता, असा आरोप करीत सोनू आगरकर यांच्या नातेवाइकांनी अकोट फैल पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, सोनू आगरकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.
-सोनू आगरकर यांना प्रसूतीसाठी येथे आणले, तेव्हा त्यांच्यात रक्ताल्पता होती व त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ६.१ एम.जी. एवढे होते. त्यामुळे त्यांना येथे दोन वेळा रक्त चढविण्यात आले. प्रसूती ‘नॉर्मल’ झाल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासाने सोनू यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे आम्ही त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘रेफर’ केले; परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला. ‘एसएनसीयू’मध्ये दाखल असलेल्या त्यांच्या नवजात मुलीचाही ‘प्रिमॅच्युअरिटी’ व ‘आरडीएस’मुळे मृत्यू झाला.
- डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.