दिवाळीनंतर गरिबांसाठी मिळाली डाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:50 PM2018-11-30T13:50:34+5:302018-11-30T13:50:36+5:30
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अखेर २४ नोव्हेंबरपासून स्वस्त दरात हरभरा डाळ व उडीद डाळीचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
- संतोष येलकर
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अखेर २४ नोव्हेंबरपासून स्वस्त दरात हरभरा डाळ व उडीद डाळीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. अशीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांत असून, दिवाळीचा सण उलटून गेल्यानंतर गरीब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळ मिळाल्याचे वास्तव आहे.
केंद्र शासनाने खरेदी केलेल्या हरभरा व उडिदाची भरडई करून, प्राप्त होणारी हरभरा डाळ व उडीद डाळ राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील कुटुंब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना स्वस्त दराने वितरित करण्याचा निर्णय गत १७ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपये प्रतिकिलो दराने हरभरा डाळ आणि ४४ रुपये प्रतिकिलो दराने उडीद डाळ वितरित करण्यासाठी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांमार्फत डाळ साठ्यांची मागणी (नियतन) शासनाकडे करण्यात आली होती; परंतु दिवाळीपर्यंत अकोल्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळीचा साठा गोदामांमध्ये उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी गरीब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील हरभरा डाळ व उडीद डाळीचा लाभ मिळाला नाही. गोदामात डाळीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर, २४ नोव्हेंबरपासून अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यांत रास्त भाव दुकानांमधून गरीब शिधापत्रिकाधारकांना हरभरा डाळ आणि उडीद डाळीचे वितरण सुरू करण्यात आले. दिवाळीपूर्वी स्वस्त दरातील डाळीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा शिधापत्रिकाधारकांकडून करण्यात येत होती; मात्र दिवाळीचा सण उलटून गेल्यानंतर गरीब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळीचे वितरण सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे.
‘या’ दराने वितरित केली जात आहे डाळ!
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ३५ रुपये प्रतिकिलो दराने हरभरा डाळ आणि ४४ रुपये प्रतिकिलो दराने उडीद डाळीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे.