महामंडळाच्या तपासणीनंतरही डेपोतील परिस्थिती जैसे थे
By admin | Published: September 25, 2015 01:05 AM2015-09-25T01:05:11+5:302015-09-25T01:05:11+5:30
एसटी डेपोची पुन्हा तपासणी आवश्यक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या नोटीसवर अहवाल सादर.
अकोला: औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या नोटीसला उत्तर देत एसटी महामंडळाने डेपोचा तपासणी अहवाल सादर केला आहे. परंतु, अहवाल सादर केल्यानंतरही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने अद्यापही महामंडळाच्या कामगारांचा जीव धोक्यात आहे. महाराष्ट्र राज्य फॅक्ट्री अँक्टनुसार कारखान्यांमध्ये कार्यरत कामगारांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. एसटी महामंडळाचा डेपो या अँक्टमध्ये मोडत असल्याने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कर्मचार्यांना पुरविण्यात येणार्या सुरक्षा व आरोग्यविषयक सुविधांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान कर्मचार्यांची सुरक्षा व आरोग्य धोक्यात असल्याचे उघडकीस आले. या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागामार्फत एसटी महामंडळाला नोटीस बजावण्यात आली होती. एसटी महामंडळाने त्वरित तपासणीचा अहवाल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे सादर केला. परंतु, अहवाल सादर केल्यानंतरही डेपोमध्ये जैसे थे परिस्थिती कायम आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या डेपोमधील कॉम्प्रेसरची तपासणी गत अनेक वर्षांपासून करण्यात आली नव्हती. महामंडळाच्या अहवालानुसार त्याची तपासणी करण्यात आली आहे. परंतु, वास्तविकतेत येथील कॉम्प्रेसर अद्यापही कामगारांसाठी धोकादायक असल्याचे कामगारांनी सांगितले. तसेच वेल्डिंग करताना सुरक्षेसाठी आवश्यक सेफ्टी ग्लासदेखील नसल्याने हा प्रकार कामगारांसाठी धोकादायक ठरत आहे. जुने बसस्थानकाच्या डेपोमध्येही कामगारांची सुरक्षा वार्यावर असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या डेपोची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे.