अकोल्यातील गणेश मिरवणूक मार्गावरील ‘पोस्टर वॉर’ बाद
By admin | Published: September 28, 2015 02:21 AM2015-09-28T02:21:06+5:302015-09-28T02:21:06+5:30
राजकीय पक्ष, नेत्यांचे फलक झळकलेच नाही.
अकोला: गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर शहरातील चौका-चौकांत झळकणारे विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नेत्यांचे फलक यंदा पहिल्यांदाच झळकले नाही. त्यामुळे शहरात गणेश विसर्जन मार्गावरील 'पोस्टर वॉर' यंदा बाद झाल्याचे रविवारी गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान आढळले. अकोला शहरातील गणेश विसर्जन मार्गावर चौका-चौकांत दरवर्षी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नेत्यांकडून गणेशभक्तांचे स्वागत करणारे पोस्टर, बॅनर्स, फलक झळकत असतात. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आमने-सामने झळकविण्यात येणार्या फलकांमुळे 'पोस्टर वॉर'चा अनुभव शहरातील नागरिकांनी अनुभवला आहे. तसेच शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणार्या फलकांमुळे मिरवणूक मार्गावरील प्रत्येक चौक पोस्टरमय झाल्याचे जाणवत होते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील गांधी चौक, सिटी कोतवाली चौक, टिळक रोड व इतर चौकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नेत्यांचे फलक लावण्यात आल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे दरवर्षी गणेश विसर्जन मार्गावर झळकणार्या फलकांमुळे पोस्टर वॉरचे चित्र यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर दिसले नाही. त्यानुषंगाने शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील 'पोस्टर वॉर' बाद झाल्याची बाब यावर्षी पहिल्यांदाच शहरातील गणेश विसर्जनदरम्यान जाणवली.