अकोला मध्यवर्ती कारागृह परिसरातील सागवान वृक्षांची कत्तल करून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:34 PM2018-06-18T15:34:45+5:302018-06-18T15:53:34+5:30
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले.
- नितीन गव्हाळे
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले. परंतु, कारागृह प्रशासनाला याचा थांगपत्तादेखील नाही. कारागृहातील लाखो रुपयांची संपत्ती असलेले सागवान रातोरात चोरटे लांबवित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीची ५० एकर जमीन आहे. यापैकी १२ एकर जमिनीवर पाच हजार सागवान वृक्ष डौलाने उभे आहेत, तर उर्वरित जमिनीवर शेती केली जाते. कारागृह प्रशासनाने शेत जमिनीवर अतिक्रमण होऊ नये आणि कारागृहाला आर्थिक उत्पन्न मिळावे, या उद्देशाने शेत जमिनीवर १९९६ मध्ये पाच हजार सागवान वृक्षांची लागवड केली. आता ही सागवानांची झाडे २५ वर्षांची झाली आहेत. बाजारपेठेत सागवानाला मोठी मागणी असून, सागवानाचे लाकूडसुद्धा प्रचंड महाग आहे. कलाकुसरेच्या वस्तू, देवघर बनविण्यासाठी सागवान लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा परिस्थितीत कारागृह परिसरातील सागवानावर अनेकांची नजर आहे. कारागृह प्रशासनाचे १२ एकरावरील सागवान वृक्षांकडे होत असलेले र्दुलक्ष पाहून, काही चोरटे याचा फायदा घेत आहेत आणि सागवान वृक्षांची कत्तल करून त्याचे लाकूड लांबवित आहेत. बुधवारी ‘लोकमत’ने कारागृह परिसरातील सागवान वृक्षांची पाहणी केली असता, परिसरातील शेकडो वृक्ष बुध्यांपासून तोडलेले दिसून आले. वादळामुळे उन्मळून पडलेले वृक्ष तोडून मध्यरात्रीच्या सुमारास लांबविण्यात येत आहेत. यासोबत या परिसरात बांबूसुद्धा आहेत. कैलास टेकडी, खदान परिसरातील काही लोक झाडांमधील बांबूसुद्धा तोडून नेत आहेत. सागवान वृक्षांची कत्तल करून त्याची चोरी होत असतानाही कारागृह प्रशासन त्याबाबत गंभीर नाही. कारागृह परिसराला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक जण शेतीमध्ये गुरे, शेळ्या चरायला सोडतात. त्यामुळे शेतीचेसुद्धा नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)
तरीही सागवानाची चोरी...
कारागृहामध्ये शेकडो कैदी कारावासात आहेत. त्या दृष्टिकोनातून पोलीस व कारागृह प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागते. एकंदरित सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारागृह परिसरात पोलिसांसोबतच कारागृह सुरक्षा रक्षकांनादेखील गस्त घालावी लागते. मध्यरात्रीदरम्यान ही गस्त असते. असे असतानाही कारागृह परिसरातील सागवान चोरीला जात आहे. यावरून गस्तीवरचे पोलीस आणि कारागृह सुरक्षा रक्षक किती गंभीर आहेत, हे दिसून येते.
कारागृह, शेती, सागवान वृक्षांच्या सुरक्षेसाठी गस्त पथक आहे. परंतु, कारागृह परिसराला सुरक्षा कुंपण नसल्यामुळे सागवान वृक्षांची कत्तल करून चोरी केली जात आहे. सुरक्षा कुंपणासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. शासनाने ७६ लाख रुपये दिले. परंतु, हा निधी कमी पडला. त्यामुळे पुढील कुंपणाचे काम थांबले आहे.
- ज्ञानेश्वर जाधव, कारागृह अधीक्षक