अनलॉकनंतर अकोला स्थानकावरून ११२ गाड्यांची ये-जा; पॅसेंजर गाड्यांची प्रतीक्षा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 10:33 AM2021-08-09T10:33:53+5:302021-08-09T10:33:59+5:30
Akola Railway Station : अकोला स्थानकावरून दैनंदिन, साप्ताहिक व द्विसाप्ताहिक अशा ११२ प्रवासी गाड्यांची ये-जा सुरू असते.
- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोना काळात ठप्प पडलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक आता हळूहळू पूर्ववत होत असून, अनलॉक प्रक्रियेअंतर्गत सर्वच क्षेत्रांतील निर्बंध सैल झाल्यानंतर रेल्वेगाड्यांची संख्याही वाढली आहे. सध्या विशेष व उत्सव गाड्या धावत असून, अकोला स्थानकावरून दैनंदिन, साप्ताहिक व द्विसाप्ताहिक अशा ११२ प्रवासी गाड्यांची ये-जा सुरू असते. तथापि, पॅसेंजर गाड्यांना अद्यापही ग्रीन सिग्नल न मिळाल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे.
मध्य रेल्वे व दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. कोरोना काळात मात्र रेल्वेस्थानक ओस पडले होते. आता विशेष गाड्या सुरू झाल्यामुळे रेल्वेस्थानक गजबजत आहे. विशेष गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकीट घेऊनच प्रवास करता येत असल्याने, अजूनही पूर्वीप्रमाणे गर्दी दिसत नाही. पॅसेंजर गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळत होता; परंतु या गाड्या अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे नजीकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मुंबई मार्गावरील गाड्यांना प्रतिसाद
मध्य रेल्वे व दक्षिण-मध्य रेल्वेच्या एकूण ११२ गाड्या अकोला स्थानकावरून धावत आहेत. अकोल्याहून मुंबई, पुणे व दक्षिण भारतात जाण्यासाठी गाड्या आहेत. यामध्ये मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना अधिक प्रतिसाद मिळत आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही बऱ्यापैकी प्रवासी दिसून येतात. दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या मात्र रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट विक्री वाढली
कोरोना काळात रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत ५० रुपये करण्यात आली होती. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रचंड घटली होती. आता पुन्हा दहा रुपये किंमत करण्यात आल्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री वाढली आहे.
सुरू असलेल्या गाड्या
०२१०५ मुंबई - गोंदिया
०२११ मुंबई - अमरावती
०१०३९ कोल्हापूर - गोंदिया
०२८०९ मुंबई - हावडा
०२१६९ मुंबई - नागपूर
०२७६६ अमरावती - तिरुपती
०७७७४ अकोला- पूर्णा डेमू
०२८३३ अहमदाबाद-हावडा
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग
रेल्वेमध्ये प्रवेश करतेवेळी मास्क घातला होता; परंतु एवढ्या लांब प्रवास करावयाचा म्हटल्यास दीर्घकाळ मास्क घालणे शक्य होत नाही. शिवाय आता कोरोनाची लाटही ओसरल्यामुळे मास्ककडे थोडे दुर्लक्ष होत आहे.
- गणेश खिरकर, प्रवासी
आता निर्बंध सैल झाल्यामुळे सगळीकडेच गर्दी होत आहे. बाजारपेठेत तर रेल्वेपेक्षा कितीतरी पटीने गर्दी होते. तेथे लोक मास्क लावत नाहीत. कोरोना काय केवळ रेल्वे प्रवासातच होतो.
- प्रमोद अहिरकर, प्रवासी