महापौर पदासाठी अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2017 01:54 AM2017-03-05T01:54:14+5:302017-03-05T01:54:14+5:30
अकोला महापालिका उपमहापौर पदासाठी वैशाली शेळके यांची उमेदवारी
अकोला, दि. ४- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने महापौर पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल तसेच उपमहापौर पदासाठी वैशाली विलास शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या दोन्ही पदांसाठी संबंधित उमेदवारांनी पालिकेत शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, असता भाजपने तब्बल ४८ जागांवर विजय प्राप्त केल्याचे समोर आले. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अकोलेकरांनी राजकीय पक्ष म्हणून भाजपला बहुमत दिल्याने महापालिकेत सत्ता स्थापनेदरम्यान होणार्या आर्थिक घोडेबाजाराला आपसूकच लगाम बसला आहे. निवडणूक आटोपल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेसाठी विशेष सभेचे आयोजन करावे लागते. त्यानुषंगाने महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले असता, ९ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली. ३ मार्च रोजी उमेदवारी अर्जांचे वाटप केल्यानंतर ४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया होती. भाजपला बहुमत मिळाल्याने महापौर, उपमहापौर पदाचे दावेदार कोण, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले होते. भाजपच्यावतीने महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल तसेच उपमहापौर पदासाठी वैशाली शेळके यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर सुमनताई गावंडे, हरीश आलिमचंदानी, गीतांजली शेगोकार, प्रवीण जगताप उपस्थित होते.
अन् दोघांचे मनोमिलन झाले!
महापौर, उपमहापौर पदासाठी आपल्या गोटातील उमेदवारांची वर्णी लागावी, यासाठी भाजपमधील अंतर्गत राजकारणाने उचल खाल्ली होती. धोत्रे गटाकडून विजय अग्रवाल, वैशाली शेळके यांची नावे समोर आल्यानंतर, दुसर्या गटातून हरीश आलिमचंदानी,आशिष पवित्रकार यांना पसंती देण्यात आली. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवशी मात्र हरीश आलिमचंदानी यांनी अर्ज सादर केला नाही. विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देत मनोमिलन केल्याचे दिसून आले.
भाजपच्यानंतर काँग्रेसचे सर्वाधिक १३ उमेदवार विजयी झाले आहेत. महापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी, तर उपमहापौर पदासाठी सुवर्णरेखा जाधव यांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, साजीद खान पठाण, शाहीन अंजूम, पराग कांबळे, शेख इब्राहिम उपस्थित होते. उपमहापौर पदासाठी शिवसेना मैदानात उतरली असून, शिवसेनेचे राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांनी अर्ज सादर केला.