वय २१, बनला कुख्यात गुंड; आता १ वर्ष जेलमध्ये स्थानबद्ध
By सचिन राऊत | Published: January 27, 2024 09:03 PM2024-01-27T21:03:01+5:302024-01-27T21:03:24+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.
अकोला :अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सैलानी नगर येथील रहीवासी तसेच कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानंतर शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे अस्त्र उगारले आहे.
डाबकी रोडवरील सैलानी नगर येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड मोहम्मद उमर माेहम्मद रियाज वय २१ वर्ष हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे,जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजीत कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पाेलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके, डाबकी रोडचे ठाणेदार किशोर जुनघरे, ज्ञानेश्वर सैरीसे, उदय शुक्ला, उमेश पाटील, सुगंधी व पोलिसांनी केली.