वय वर्ष ९८...अजूनही कसतात शेती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:24 AM2020-07-12T10:24:16+5:302020-07-12T10:25:16+5:30
या वयातही ते शेतात वखर, डवरे हाकण्याचं काम करतात
- सत्यशील सावरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : साठी ओलांडलेले अनेक जण अंथरूणाला खिळलेले किंवा काहीतरी व्याधींनी त्रस्त असलेले अनेक लोक आपण पाहतो; परंतु आज तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील नºही रावजी अढाऊ या आजोबांचे वय तब्बल ९८ वर्ष आहे. दोन वर्षानंतर वयाचं शतक हे आजोबा साजरं करतील. या वयातही ते शेतात वखर, डवरे हाकण्याचं काम करतात. त्यांच्यातील आत्मविश्वास, फिटनेस कमालीचा आणि तरुणाईलाही लाजवणारा असाच आहे.
चार पिढ्यांपासून हे नºहजी अढाऊ शेतात राबत आहेत. आतासुद्धा मुले, नातवंडांसोबत शेतीची मशागत करतात. दररोज शेतात जाणे, शेतातील कामे करणे, हा त्यांचा दिनक्रम आहे. लहानपणापासून वडिलांच्या सोबतीने शेतात राबले. त्यांना मुले, सुना त्यांना आराम करण्यास सांगतात; परंतु त्यांना काम स्वस्थ बसू देत नाही. ते आवडीने बैलजोडी स्वत: हाकून वखर, डवरणी, निंदणाची कामे करतात. त्यांना कुठलाही आजार नाही, स्मरणशक्ती साबुत आहे. शेतात गेलो नाही तर करमत नाही, असे ते म्हणतात. या वयातही त्यांची काम करण्याची वृत्ती, जोश पाहून अनेकांना अप्रूप वाटते.
शेताचे केले नंदनवन
नºहीजी अढाऊ यांनी मुलांना सोबतीला घेऊन कोरडवाहू, नंतर बागायती शेतीवर भर दिला. पारंपरिक पिकांसोबतच, त्यांनी भाजीपाला पिकाची जोड दिली. यासोबतच फळझाडे, फुलझाडांची शेताच्या बांधावर लागवड केली. त्यामध्ये बोर, चिंच, पेरू, आंबा, फणस, सीताफळ, रामफळा आदी झाडांचा समावेश आहे. त्याच बरोबर झेंडू, गुलाब आदी फुलांचे उत्पादनसुद्धा ते घेतात. घरी बसून आराम करण्याच्या वयातही ते शेत काम स्वत:ला गुंतवून ठेवतात. त्यांना कोणताही आजार, व्याधी नाही. शेतातील कामांमुळे त्यांचे शरीर एकदम फिट आहे.