१८ वर्षावरील लाभार्थ्यांच्या नोंदणीत वयाचा अडथळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:04+5:302021-04-29T04:14:04+5:30
शासनाच्या निर्देशानुसार, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेसाठी बुधवार २८ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार होती. नोंदणी प्रक्रियेसंदर्भात ...
शासनाच्या निर्देशानुसार, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेसाठी बुधवार २८ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार होती. नोंदणी प्रक्रियेसंदर्भात सोशल मीडियावर गुरुवारी सायंकाळपासूनच संदेश व्हायरल झाले. त्यामध्ये नोंदणी प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कोविन ॲपच्या संकेतस्थळाचीही माहिती देण्यात आली. या आधारावर बुधवारी सकाळपासूनच १८ ते ४४ वयोगटातील अनेकांना मोठ्या आतुरतेने नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली. संकेतस्थळावर नाेंदणीदरम्यान मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि जन्म वर्ष टाकल्यानंतर नोंदणीची सेवा केवळ ४५ वर्षावरील व्यक्तींंसाठीच उपलब्ध असल्याचे दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे प्रयत्न विफल झाल्याने तरुणाईमध्ये निराशेचे वातावरण दिसून आले.
तरुणाईत लसीकरणाची उत्सुकता
कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त असून यामध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये कोविड लसीकरणाची उत्सुकता पाहावयास मिळत आहे. १ मे पासून लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार असल्याने या वयोगटातील लोकांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही नोंदणी शक्य नसल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे बुधवारी दिसून आले.
यामुळे येताहेत अडचणी
सद्यस्थितीत शासकीय कोविड लसीकरण केंद्रांमध्ये लसीचा तुटवडा आहे. ही मोहीम खासगी केंद्रांमध्ये राबविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक लस संबंधित केंद्रचालकांना थेट लस निर्मात्या कंपन्यांकडून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी लसीकरण केंद्र कोणती असतील हेदेखील अद्याप स्पष्ट झाले नाही. केंद्रच निश्चित नसल्याने ऑनलाईन नोंदणीदेखील निश्चित नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.