भगीरथवाडीत दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 01:56 AM2016-09-14T01:56:49+5:302016-09-14T01:56:49+5:30
महिलेसही मारहाण; दोघे जण गंभीर जखमी झालेत.
अकोला, दि. १३ : जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगीरथवाडी येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली. या हाणामारीत महिलेसही बेदम मारहाण करण्यात आली असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भगीरथवाडी येथे घरासमोर उभे राहण्याच्या कारणावरून दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सवरेपचार रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांनी ताफ्यासह घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली. या हाणामारीत घरासमोर उभे राहण्यावरून दोन गट भिडल्याची माहिती ठाणेदार शेख यांनी दिली.
महिलेचे कपडे फाडल्याची चर्चा
भगीरथवाडी येथे हाणामारी सुरू असताना एका गटातील युवकांनी महिलेचे कपडे फाडल्याची चर्चा रंगली होती. या संदर्भात ठाणेदार रियाज शेख यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेचा स्पष्ट नकार दिला. या ठिकाणी महिलेस किरकोळ मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले; मात्र कोणत्याही महिलेचे कापड फाडले असा प्रकार भगीरथवाडी येथे घडला नसल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी दोन्ही गटातील युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.