कृषिदूत पोहोचवणार शेतक-यापर्यंत कृषितंत्रज्ञान !
By admin | Published: May 23, 2016 01:33 AM2016-05-23T01:33:09+5:302016-05-23T01:33:09+5:30
एकीकृत कीड व्यवस्थानावर भर; डॉ. पंदेकृविने दिले प्रशिक्षण.
अकोला: पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये कृषिदूत योजना राबविण्यात येत असून, शेतकर्यांना नवकृषितंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती शेतकर्यांना गावपातळीवर देण्यात येणार आहे. याकरिता १७0 कृषिदूतांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी प्रशिक्षण दिले. या योजनेसाठी गावातील युवकांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. या पृष्ठभूमीवर रतन टाटा ट्रस्टच्यावतीने शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषिदूत योजना सुरू करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचे अवलोकन करू न ते तंत्रज्ञान आपल्या गावातील शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात कृषिदूत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे कमी खर्चाच्या शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. अशाप्रकारे कृषिदूतांनी कापूस, तूर, सोयाबीन पिकांवरील शेतकर्यांचा प्रतिएकरी होणारा खर्च कमी केला असून, उत्पादनवाढीसाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत. यावर्षी पश्चिम विदर्भातील बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, नेर, मोर्शी आणि धारणी या गावांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. पाच जिल्ह्यांत जवळपास २५0 कृषिदूत गावपातळीवर काम करणार आहेत. कृषिदूतांना जी गावे दिली आहेत, त्या गावांच्या शिवारातील शेतीसंदर्भात येणार्या अडचणी ते सोडवण्याचे प्रयत्न करणार आहेत. याबाबत ते कृषी विद्यापीठाच्या संपर्कात असतील. कृषिदूतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रक्षेत्र अधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सर्व कृषिदूत हे मानधनावर काम करीत आहेत.