अकाेल्यात अग्रसेन मेडिकल उपकरण ‘बँक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:06+5:302021-06-28T04:15:06+5:30
अकोला : कोरोनाच्या संकट काळात घराघरांत वाढलेल्या रुग्णांची गरज लक्षात घेता महाराष्ट्र राज्य युवा अग्रवाल संमेलन व निकेश गुप्ता ...
अकोला : कोरोनाच्या संकट काळात घराघरांत वाढलेल्या रुग्णांची गरज लक्षात घेता महाराष्ट्र राज्य युवा अग्रवाल संमेलन व निकेश गुप्ता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराजा अग्रसेन मेडिकल व अर्थोपेडिक उपकरण बँकेचा प्रारंभ अकोल्यात करण्यात आला.
न्यू राधाकिसन प्लॉट्समधील श्री अग्रसेन भवन येथे रविवारी (दि. २७ जून) संत तुकाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल, अग्रवाल समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन करण्यात आले. राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष निकेश गुप्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाेते. संमेलनाचे जिल्हाध्यक्ष निरंजन अग्रवाल, महिला अध्यक्षा निर्मला झुनझुनवाला, युवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रतुल भारूका, योगेश गोयल, मारवाडी मंचचे मनोज अग्रवाल, आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोना काळात युवा मंच व राजस्थानी संघाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या घरपोच टिफिन सेवा व ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुरवठा योजनेबद्दल यावेळी गिरीश अग्रवाल यांनी गौरवोद्गार काढले. बंटी कागलीवाल यांनी यावेळी अग्रवाल समितीच्यावतीने काही उपकरणे या बँकेला उपलब्ध करून देण्याची घाेषणा केली.
काेराेनानंतर अनेक आजारांचा प्रादुर्भाव हाेताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय आणि ऑर्थोपॅडिक उपकरणे या बँकेच्यावतीने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. प्रतीक अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले, तर वैभव अग्रवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रितेश चौधरी, शिवम अग्रवाल, अभिषेक सोनालवाला, रोहित रुंगटा, अमोल ककरानिया, गोपाल टेकडीवाल, अभिषेक अग्रवाल, कृष्णा तातिया, केतन गुप्ता, रितिक अग्रवाल, रितेश गोयल, सचेत अग्रवाल, शुभम अग्रवाल, चेतन अग्रवाल, चंदन अग्रवाल, यश केजडीवाल, गणेश अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी श्रीकिशन अग्रवाल, कैलाशमामा अग्रवाल, कमलकिशोर अग्रवाल, डॉ. के. के. अग्रवाल, सुरेशचंद्र अग्रवाल, राजीव बजाज, अनिल पाडिया, ओमप्रकाश पाडिया, विजय झुनझुनवाला, आशा गोयनका, संजय टिकुपोते, ललित गुप्ता, मदनलाल गोयनका, रोहित केडिया, ओमप्रकाश केडिया, संजय महादेव अग्रवाल, सिद्देश मुरारका, आदी उपस्थित होते.
रुग्णांना या साहित्याचा आधार...
महाराजा अग्रसेन मेडिकल उपकरण बँकेच्या माध्यमातून रुग्णांना जनरल बेड, एअर बेड, वॉटर बेड, व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर, सलाईन स्टँड, नेब्युलायझर, आदी उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
माणुसकी धर्म जागवणारी सेवा...
कोरोनाच्या संकटामुळे व्यापार उद्योगावर संकट कोसळलेच, पण नात्यांनादेखील झळ बसली. जिवाच्या भीतीने रक्ताचे नातेवाईक हातचे राखून वागू लागल्याचे दिसून येत आहे, अशा स्थितीत माणुसकीचा धर्म निभावणारी सेवा गरजेची असून, अग्रसेन उपकरण बँकेच्या माध्यमातून ती घडून येईल, असा विश्वास यावेळी उद्घाटक ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी व्यक्त केला.