‘ईईएसएल’सोबत करार; महापालिकेच्या डोक्याला ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:23 PM2019-04-16T12:23:44+5:302019-04-16T12:23:53+5:30
मागील महिनाभरापासून पथदिवे लावण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.
- आशिष गावंडे
अकोला: मोठा गाजावाजा करत सत्ताधारी भाजपने ६ मार्च रोजी ‘ईईएसएल’ कंपनीसोबत एलईडी पथदिवे लावण्याचा करारनामा केला. ज्या दिवशी करारनामा केला त्याच दिवशी घाईघाईत प्रभाग क्रमांक १२ मध्ये पथदिव्यांचे उद्घाटनही आटोपण्यात आले. मागील महिनाभरापासून पथदिवे लावण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले असून, या प्रकारामुळे महापालिकेच्या डोक्याला नवीनच ताप लागल्याचे बोलल्या जात आहे.
एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची निवड केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला आहे. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यावर खर्च होणारी वीज व त्या बदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करारनामा मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांना घाई होती. त्यानुषंगाने ६ मार्च रोजी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजय कापडणीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी करारनाम्यावर स्वाक्षºया केल्या. त्यावेळी मनपातील सर्व पदाधिकारी व काही नगरसेवक उपस्थित होते.
घाईघाईत उद्घाटनही केले!
महापौरांच्या दालनात कंपनीसोबत करार होताच त्याच दिवशी सायंकाळी प्रभाग क्रमांक १२ मधील लोहिया जीन येथे आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक अजय शर्मा यांच्या उपस्थितीत एलईडीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतरही कामाची गती अशीच राहील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.