तेल्हाऱ्यातील कृषी केंद्र चालकांनी डीएपी खताची विक्री केली बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:45+5:302021-05-21T04:19:45+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची बाजारात पेरणीपूर्वीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कृषी केंद्रावर रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी ...
खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची बाजारात पेरणीपूर्वीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कृषी केंद्रावर रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी गेले असता सर्वांत जास्त डीएपी या रासायनिक खताची मागणी करीत आहेत. मात्र, शहरातील अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांनी डीएपी खताचा भाव विचारला असता कृषी केंद्र चालकांनी खत उपलब्ध नाही असे उत्तर दिले. रासायनिक खतांच्याबाबतीत केंद्र सरकारने जाहीर केलेले दर बघता, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी कृषी केंद्र चालकांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला आहे. ग्राहक बघून खतांची विक्री करीत आहेत.
खतांच्या दरात मोठी तफावत
१०.२६.२६, २०.२०.१३, सुपर फॉस्पेट या खतांचे दर विचारले असता १०.२६.२६ खते १२९५ रुपयांपासून ते १४५० रुपये, तर २०.२०.१३ खत १०६० रुपयांपासून ते ११५० पर्यंत, सुपर फॉस्पेट ४०० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. शासनाने सर्व रासायनिक खतांचे दर निश्चित करून दिले असताना एवढी तफावत का? किंवा ऐन पेरणीच्या तोंडावर विक्री बंद का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
डीएपी खतांचा तुटवडा नसून, खत बाजारात उपलब्ध आहे. तसेच इतर रासायनिक खतांच्या भावांमध्ये फरक पडायला नको. एकाच भावाने विक्री झाली पाहिजे. याबाबतीत कृषी केंद्र चालकांकडे चौकशी केली जाईल.
- भरत चव्हाण,
कृषी अधिकारी, पंचायत समिती तेल्हारा