कृषी विज्ञान केंद्रांचे शेतकी विकासात मोलाचे योगदान
By admin | Published: April 21, 2017 12:34 AM2017-04-21T00:34:12+5:302017-04-21T00:34:12+5:30
डॉ. चारीआप्पा; वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन
अकोला : कृषी विज्ञान केंद्रे कृषी तंत्रज्ञान प्रसारात महत्त्वाची, समन्वयाची भूमिका बजावत असून, ग्रामीण भारत कृषी प्रगतीच्या दिशेने अधिक प्रबळ करण्यात या कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे योगदान स्पृहणीय आहे, असे प्रतिपादन हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे संचालक डॉ. चारीआप्पा यांनी गुरुवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित कृषी विज्ञान केंद्राच्या दोन दिवसीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अधिष्ठाता कृषी डॉ. विलास भाले होते. याप्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. चारी म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशांतर्गत शेती समृद्धीसाठी अनेकानेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अल्पभूधारक, मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे कृषी निविष्ठा, उत्पादके आणि तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठीची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्रांना प्रदान करण्यात आली आहे. याच भूमिकेतून शेती तंत्रज्ञान प्रचार-प्रसारासोबतच संपर्क, शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिके, चाचण्या व्यवहार्य, अनुकरणीय असाव्या व जिल्ह्यातील शेतीच्या गरजा टिपत उपाययोजना अमलात आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी सजग असावे, असे आवाहनही डॉ. चारी यांनी याप्रसंगी केले. या दोन दिवसीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या ठोस निष्कर्ष आणि उपाययोजनावर सांगोपांग चर्चा होऊन आयोजनाचा उद्देश सफल करावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यापीठ संशोधित पीक वाणांचा, शिफारशीचा प्रसार, वापरादरम्यान शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी व त्यावर आधारित सुधारणा करीत कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचे नाते अधिक घट्ट होण्यात साहाय्यभूत ठरावे, असे आवाहन डॉ. भाले यांनी केले.
यावेळी विदर्भातील सर्व १४ कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, अधिकाऱ्यांच उपस्थिती होती तांत्रिक सत्राला कार्यक्रम समन्वयक, विषयतज्ज्ञ, कार्यक्रम सहायक यांनी गत वर्षात केलेले कार्य आणि येत्या वर्षात करावयची कामे येथे सादर केली. प्रास्ताविक डॉ. इंगोले यांनी तर संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.