कृषी विद्यापीठासह जिल्हय़ातील तळे, जलसंधारण बंधार्यात ठणठणाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:13 AM2017-08-23T01:13:57+5:302017-08-23T01:15:23+5:30
अकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम विदर्भातील बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात बर्यापैकी पाऊस झाला आहे. पण, अकोला जिल्हय़ात दोन्हीही दिवस झालेला पाऊस हा १५ मि.मी.च्यावर वर नव्हता. हा पाऊस सर्वत्र नसल्याने काही भागात पडलेल्या पावसाची ही आकडेवारी आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात बहुतांश ठिकाणी जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली; परंतु त्यामध्ये पाणीच नसल्याने संरक्षित ओलितही शेतकर्यांना करता येत नसल्याची स्थिती आहे. कृषी विद्यापीठाच्या पाणलोट विकास प्रक्षेत्रावर जलसंधारणाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, वॉटर बँक तळे, अशी विविध कामे करण्यात आली आहेत. तसेच विहिरींचा गाळ उपसादेखील करण्यात आला आहे. सन २00४-0५ मध्ये यावर्षीसारखीच स्थिती होती. त्याच पृष्ठभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे. पण, यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने पुन्हा १२ वर्षांपूर्वीचे चित्र उभे झाले आहे. कृषी विद्यापीठातील बंधारे कोरडी आहेत.
शिवणी भागाकडून येणार्या नाल्याचे खोलीकरण केल्याने गतवर्षी या नाल्यात जलसाठा संकलित झाल्याने, या भागातील भूगर्भ पातळी अडीच मीटरने वाढली होती. या भागातील सर्व विहिरींची जलपातळी वाढली होती. हे पाणी या नाल्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत होते. त्यामुळे रब्बी पिके व बीजोत्पादनाच्या कामात हे पाणी आले होते. तथापि, यावर्षी हा नाला कोरडा आहे. इतर सर्वच ठिकाणच्या नाल्यात पाणी उपलब्ध नसल्याने यावर्षीचे पाण्याचे हे चित्र कृषी विद्यापीठासमोर संकट घेऊन आले आहे. शरद सरोवर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणात गेले आहे; पण इतर दोन तळे आहेत, तेही कोरडीच आहेत.
अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाच्या मागे वॉटर बँक तळे निर्माण करण्यात आले आहे. या तळय़ात पाणी साचल्यानंतर ते भूगर्भात जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली असू्न, येथे सबर्मसिबल इलेक्ट्रिक पंप लावण्यात आला आहे. या तळ्यात साचलेले पाणी एटीएमसारखे वापरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी हे तळे पाण्याने गच्च भरले होते. यावर्षी मात्र कोरडे आहे.
-