कृषी केंद्रांनी अनुदानित बियाणे वाटप याद्या दडवल्या!
By Admin | Published: November 8, 2016 02:19 AM2016-11-08T02:19:12+5:302016-11-08T02:19:12+5:30
कृषी विभागाचे बोटचेपे धोरण; महाबीज वितरकांकडूनही दिरंगाई.
अकोला, दि. ७- महाबीजने रब्बीसाठी दिलेल्या अनुदानित हरभरा बियाणे वाटपातून कृषी सेवा केंद्र संचालकांनीच उखळ पांढरे केल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला लाभार्थी शेतकर्यांच्या सात-बारासह याद्याच दिलेल्या नाहीत. सोमवारपर्यंतही त्या याद्या कृषी विभागाकडे उपलब्ध नव्हत्या, हे विशेष. गरजू शेतकर्यांवर अन्याय करण्यासोबतच अनुदानाची रक्कम घशात घालणार्या कृषी सेवा केंद्र संचालकांबाबत कृषी विभागाचे असलेले बोटचेपे धोरणही त्या अन्यायाला मूक संमती असल्यासारखेच दिसत आहे.
महाबीजने २४ सप्टेंबर २0१६ या दिवसांपासून अनुदानित बियाणे वितरकांना दिले. बियाणे बॅगवर कोणताही शिक्का नव्हता. त्यामुळे काही कृषी सेवा केंद्रांनी सुरुवातीचे बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री केले. अनुदानाची रक्कम आणि बाजारातील अतिरिक्त किमतीचा मलिदा कृषी सेवा केंद्र संचालकांनी लाटला. गरजू शेतकर्यांना बियाणे मिळत नसल्याची ओरड झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत मोठय़ा प्रमाणात बियाण्यांचा काळाबाजार झाला. ह्यलोकमतह्णने त्याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रात धाव घेऊन शेतकर्यांना रांगेत बियाणे वाटप सुरू केले; मात्र पूर्वी वाटप झालेल्या लाभार्थी शेतकर्यांची यादी, सात-बारा गोळा करण्यास हयगय केली. त्यामुळे आठवडाभरानंतरही लाभार्थी शेतकर्यांची यादी महाबीज किंवा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. त्या शेतकर्यांची पडताळणी करणेही कृषी विभागाला जमलेले नाही. त्यातूनच कृषी सेवा केंद्र संचालकांनी केलेला घोळ उघड होणार आहे; मात्र त्याकडेच कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.