जवस पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतीशाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:47 PM2020-03-23T18:47:14+5:302020-03-23T18:47:25+5:30
संपूर्ण विदर्भात शेतावरच शेतीशाळा घेण्यात येत आहेत.
अकोला : औषधी गुणधर्मासह ओेमेगा-३ चे प्रमाण सर्वाधिक असलेल्या जवस पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी लक्ष केंद्रित केले असून, शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण विदर्भात शेतावरच शेतीशाळा घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागील उद्देश आहे.
राज्यात जवसाचे क्षेत्र १४ हेक्टरवर असून, यातील विदर्भात ६,५०० हेक्टर आहे. या तेलवर्गीय पिकात ५७ ते ५८ टक्के ओमेगा-३ आहे. हे सर्वाधिक पोषक असून, गुुडघे, हृदयविकार, मधुमेह आदी रोगांवर तर खूपच गुणकारी आहे. जवसाचे दररोज ३० ग्रॅम सेवन केल्यास हे रोग नाहीसे होतात. एकूणच आरोग्यासाठी जवस लाभदायक आहे. एवढेच नाही तर तेल काढल्यांनतर जी ढेप तयार मिळते ती जनावरांना आणि कोंबड्यांना खाऊ घातल्यास जनावरांच्या दुधात, कोंबड्यांच्या अंड्यांत आणि चिकनमध्येही ओमेगा-३ चे प्रमाण आढळून आले आहे. आपल्याकडे मोजक्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये हे उपलब्ध आहे. याचा परदेशातही अभ्यास झाला आहे. विशेष म्हणजे यात फायबर असल्याने जवस काढल्यानंतर उरलेल्या धसकट, कुटारातदेखील हा पदार्थ उपलब्ध होतो. यापासून चांंगला धागा तयार होत असल्याने सध्या देशातील नामवंत कंपन्या हे परदेशातून मागवत आहे. याचा वापर बॅ्रन्डेड लिनन कापड व नोटा तयार करण्यासाठी केला जातो. एका एकरात असे कुटार, धसकट जवळपास २ ते ३ क्विंटल प्राप्त होत असते. तसेच जवसाचे एकरी उत्पादन हे चार ते पाच क्विंटल आहे. हे पीक कृषी मूल्य आयोगाच्या यादीत नसल्याने आधारभूत किंमत नाही. त्यामुळे बाजारात जवसाचे दर प्रतिक्विंटल ३,५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत असतात. हे दर वाढल्यास आणि प्रसार, प्रचार करू न शेतकºयांना मार्गदर्शन केल्यास या पिकाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रत्यक्ष शेतावर शेतीशाळा घेण्यावर भर दिला असून, याची सुरुवात अकोला आणि वर्धा जिल्ह्यातून करण्यात आली आहे. शेतकºयांनी हे पीक घ्यावे.
जवसात ओमेगा-३ सर्वाधिक असून, मानवी आरोग्यासाठी सर्वात उपयोगी आहे. या पिकाचा काडीकचरा, धसकटापासून उच्च दर्जाचे कापड, धागा तयार होतो तसेच नोटा बनविण्यासाठीही वापर केला जातो. तेलाचे भाव चांगले आहेत.
- डॉ. बिना नायर,
प्रामुख,अ.भा. समन्वयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, डॉ. पंदेकृवि, नागपूर.