मध्यप्रदेशातील शेतमजूर रोजगारासाठी आले आकोट तालुक्यात
By admin | Published: January 17, 2015 01:22 AM2015-01-17T01:22:58+5:302015-01-17T01:31:58+5:30
स्थानिक शेतक-यांकडून मध्यप्रदेशातील मजुरांना वाढती मागणी
आकोट : मध्यप्रदेशातील प्रामुख्याने आदिवासीबहुल भागातील शेतमजूर मोठय़ा प्रमाणात रोजगारासाठी भटकंती करीत आकोट तालुक्यात दाखल झाले आहेत. तालुक्यात सधन कास्तकारांकडे मध्यप्रदेशातील कुटुंब शेतातच कामाला असल्याने सोयीचे ठरत आहे. त्यामुळे स्थानिक शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे.
आकोट तालुक्यात खरीप व रबी पिके मोठय़ा प्रमाणात घेण्यात येतात. त्यामुळे शेतमजुरांचा मोठा वर्ग या भागात आहे. कधीकाळी शेतमजूर मिळत नसल्याने बोर्डी गावात मजुरीची बोली बोलून मजुरांचा लिलाव केला जात होता. त्यानंतर हा सर्व ताफा शेतकर्यांकडे कामाला जात असे. आता ही प्रथासुद्धा मोडीत निघाली आहे. सध्या मजुरीचे दर वाढल्याने ते शेतकर्यांना परवडत नाहीत, तर शेतात मजुरी कमी मिळत असल्याने स्थानिक मजूर शेतीत काम करण्यास नाक मुरडतात. दुसरीकडे मध्यप्रदेशातील शेतमजूर कमी दराने उपलब्ध होत असल्याने आकोट तालुक्यातील त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. आठवड्याला एकदा सर्व मजुरी चुकवावी लागत असल्याने शेतकर्यांनासुद्धा सोयीचे ठरत आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील ठेकेदारांकडून मोठय़ा प्रमाणात शेतमजूर आणले जात आहेत. रेल्वेने तसेच सातपुड्यातील पथमार्गाने शेतमजुरांचा लोंढा आकोट तालुक्यात दाखल होत आहे. सध्या तालुक्यातील सावरा शिवारात मध्यप्रदेशातील मजूर तूर काढण्यात गुंतले आहेत. कमी वेळात जास्त कामे होत असल्याने व मजुरीच्या पैशात मोटी तफावत असल्याने मध्यप्रदेशातील मजुरांची मागणी वाढत चालली आहे. स्थानिक मजूर शेतीत कामे करण्यास उत्सुक नसल्याने मध्यप्रदेशातील शेतमजुरांसाठी आकोट तालुक्यात अच्छे दिन आले आहेत.