कृषी क्रांतीवरच देशाची महासत्तेकडे वाटचाल - विकास आमटे
By admin | Published: January 24, 2017 02:43 AM2017-01-24T02:43:03+5:302017-01-24T02:43:03+5:30
कृषी महाविद्यालयाच्या ५७ व्या ‘वीर झंकार’ स्नेहसंमेलाचे उद्घाटन.
अकोला, दि. २३- कृषिप्रधान देशात कृषी शिक्षणाने गगनभरारी घेतली असून, नवे तंत्रज्ञान, संशोधन शेतकर्यांच्या आर्थिक, सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कृषी क्रांतीचा हाच टप्पा देशाला महासत्तेकडे नेणारा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, आनंदवन महारोगी सेवा समितीचे डॉ. विकास आमटे यांनी सोमवारी केले. - ५
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाद्वारे आयोजित ५७ व्या वार्षिक स्नेहसंमेलन ह्यवीर झंकारह्णच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर नीलिमा दाणी, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉ. एस. एस. माने, डॉ. पी. बी. उमाळे, डॉ. व्ही. एल. गावंडे, यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी राहुल तायडे, स्नेहा मुसळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. आमटे म्हणाले खरा भारत खेड्यात असून, कृषी क्रांतीत शेतकर्यांचा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. कृषिरत्न स्व. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्वप्नातील देश घडविण्यात कृषी शिक्षणाचा वाटा नोंद घेण्याजोगा आहे. कृषी क्षेत्रात युवकांचा वाढता कलही महत्त्वाचा आहे. कारण युवा शक्तीच्या बळावरच हा देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात डॉ. आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या योगदानावर प्रकाश टाकला. आनंदवन हे खर्या अर्थाने समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी आनंदवनाचे सचित्र व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर उभे करू न समाजाप्रती आपल्या कर्तव्याची अनेक वास्तविक रूपे यावेळी तरुण विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होत श्रावण केली.
बाबा आमटे यांनी आपल्या आयुष्याचे सर्वस्व रुग्णसेवेला सर्मपित केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा समाजसेवेचा वसा सर्मथपणे पेलत महारोगी, दिव्यांग, समाजाने नाकारलेल्यांची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. इतका प्रचंड त्याग, सर्मपण जे आमटे कुटुंबाने या देशाला दिले त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य असल्याचे भावनिक प्रतिपादन डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले.
प्रास्ताविक राहुल तायडे व स्नेहा मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन धम्मदीप आठवले, अंकिता गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीषा यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तीन दिवस चालणार्या या उत्सवात सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.