कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:10 AM2020-11-03T11:10:51+5:302020-11-03T11:11:00+5:30
Akola News आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून कर्मचारी संघातर्फे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.
अकोला: सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या अंतर्गत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी शहीद स्मारक येथे निदर्शने दिली. कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि दहा ते ३० वर्षांनंतर अनुज्ञेय असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करा, या मागणीसाठी कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अंतर्गत २७ ऑक्टोबर रोजी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासन धोरणाचा निषेध केला होता. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून कर्मचारी संघातर्फे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या आंदोलनादरम्यान चारही कृषी विद्यापीठातील कर्मचारी काळ्या फिती लावून लेखणी बंद ठेवणार आहेत. त्यामुळे या काळात सर्वच कृषी विद्यापीठातील कामकाज प्रभावित होत आहे. दरम्यान ४ नोव्हेंबर राेजी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या प्रतिनिधींसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार असल्याची आशा कृषी विद्यापीठ कर्मचारी संघाला आहे.
तर ७ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद!
आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून ६ नोव्हेंबर रोजी चारही कृषी विद्यापीठातील कर्मचारी सामूहिक रजा आंदोलन करणार आहे. यानंतरही तोडगा न निघाल्यास ७ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे देण्यात आला आहे.