कृषी विद्यापीठांच्या परीक्षा १५ जूनला; नियोजन ठरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:35 AM2020-05-22T10:35:30+5:302020-05-22T10:35:41+5:30
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ८ मे रोजी कृषी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व निर्धारित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जूनपर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा समावेश आहे. यासंदर्भात गुरुवारी एका बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ८ मे रोजी कृषी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व निर्धारित केले आहे. या पृष्ठभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील १०१९-२० शैक्षणिक वर्षातील विविध कृषी व संलग्न विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकरिता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा परीक्षा नियोजन आराखडा केला आहे. या विषयावर पुन्हा गुरुवारी बैठक होऊन परीक्षा घेण्याचे ठरले. तशा सूचना सर्व कृषी महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. बीएससीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यासंदर्भात आणि आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या काही विषयांची परीक्षा झाली आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या वर्षाचे सरासरी ५० टक्के गुण देऊन २, ४ आणि ६ व्या सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. या आॅनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. ज्यांना आॅनलाइन संदर्भात अडचणी आहेत, गावात नेट उपलब्ध नाही, असे विद्यार्थी आॅफलाइन परीक्षा देऊ शकतात; पण त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना रीतसर अर्ज करून यासाठीची परवानगी घ्यावी लागणार आहे.
कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी गाइड्सची नेमणूक केलेली आहे. ‘आयसीएआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १५ जुलैपर्यंत निकाल देणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू व्हावे, असा यामागील उद्देश आहे.
‘आयसीएआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. १५ जूनपर्यंत परीक्षा आणि १५ जुलैपर्यंत निकाल घोषित करायचा आहे. यासंदर्भात गुरुवारी बैठक झाली आहे. यासंदर्भात सर्व कृषी महाविद्यालयांना सूचना देण्यात येत आहेत.
- डॉ. प्रदीप इंगोले, संचालक शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.