कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर १0 टक्के पेरणी!
By admin | Published: June 27, 2016 02:47 AM2016-06-27T02:47:55+5:302016-06-27T02:47:55+5:30
मूग, उडीद पेरले; पावसाची प्रतीक्षा.
अकोला : जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस पडला नाही. असे असले तरी शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. अकोला तालुक्यात बर्यापैकी पडलेल्या पावसाच्या भरवशावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जवळपास सव्वा तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यत १0 टक्के क्षेत्रावर मूग व उडिदाची पेरणी करण्यात आली आहे. विदर्भात अद्याप पेरणीलायक दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे; परंतु अधूनमधून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्याने अनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शंभर मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला शेतकर्यांना दिला; परंतु कृषी विद्यापीठानेच ८0 मि.मी. पडलेल्या पावसाच्या भरवशावर पेरणीला प्रारंभ केला. तथापि, शनिवारी पावसाचा थेंबही पडला नाही. कृषी विद्यापीठाच्या परिसरातील तापमान ३२ वरू न ३६ डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचल्यावरचे तापमान आणि जमिनीतील दमट वातावरण पिकांचे अंकुर निघू देते की नाही, याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी खोलगट जमीन आहे, त्या ठिकाणी ओलावा टिकून असल्याने पेरलेल्या बियाण्याचे अंकुर फुटण्यास मदत होईल. दरम्यान, मागील २४ तासांत विदर्भात वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ५ से.मी., पुसद,सावनेर, उमरखेड येथे प्रत्येकी ४ से.मी., महागाव, मानोरा, मोर्शी येथे प्रत्येकी २ से.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर दारव्हा, नांदगाव -काजी, सिंदेवाही व यवतमाळ येथे १ से.मी. पाऊस पडला. उर्वरित विदर्भ मात्र कोरडा होता. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकर्यांच्या जिवाची घालमेल होत आहे. बीजोत्पादनासाठी मूग, उडीद पेरणी मागील वर्षी सुरुवातीला पाऊस आला नसल्याने सर्वदूर मूग, उडिदाचे पीक शेतकर्यांच्या हातातून गेले. तसेच ते विद्यापीठाबाबत झाल्याने कृषी विद्यापीठाकडे बीजोत्पादनासाठी बियाणे मिळणे कठीण झाले. यावर्षी पाऊस चांगला असल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने कृषी विद्यापीठाने मध्यवर्ती संशोधन व मुख्य बीजोत्पादन केंद्रावरील काही प्रक्षेत्रावर मूग, उडिदाचे नियोजन केले आहे.