समस्या सोडविण्यासाठी आता कृषी समाधान शिबिर!
By admin | Published: July 15, 2017 01:37 AM2017-07-15T01:37:15+5:302017-07-15T01:37:15+5:30
पालकमंत्र्यांची अभिनव संकल्पना : १८ व २० जुलै रोजी आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तालुकानिहाय घेतलेल्या समाधान शिबिरांमुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्नाचा पाठपुरावा स्वत: पालकमंत्री करीत आहेत. या शिबिराांची उपयुक्तता अधोरेखित झाल्यामुळेच आता कृषी क्षेत्राच्या संदर्भाने विशेष समाधान शिबिर घेण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी हाती घेतली आहे.
येत्या १८ व २० जुलै रोजी हे शिबिर होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना थोडाही त्रास होऊ नये यासाठी समाधान शिबिरांच्या धर्तीवर आता हे कृषी समाधान शिबिर होत आहेत. या शिबिरामध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशके, निविष्ठा तसेच फळबाग, केळी उत्पादन गट, शेततळे या संदर्भातील काही तक्रारी असल्यास तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात १८ आणि २० जुलै रोजी ही शिबिरे पार पडणार आहेत़. या शिबिरामध्ये कृषी खात्याचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत़
यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातुर असताना त्याला आपल्या कामासाठी शासन दरबारी कोणतेही खेटे घालावे लागू नयेत, त्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली निघावेत, शासनाच्या विविध योजनांची त्याला माहिती मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शुक्रवारी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तक्रारींचा तत्काळ निपटारा होणार !
मंगळवार १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह अकोट येथे अकोट आणि तेल्हारा तालुका तसेच १८ जुलै रोजीच दुपारी २ वाजता बाळापूर आणि पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाळापूरच्या खविसं सभागृहात या शिबिराचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. गुरुवार २० जुलै रोजी सकाळी १० वाजता अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तर याच दिवशी दुपारी २ वाजता मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर येथे हे शिबिर घेण्यात येणार आहे़
कृषीच्या संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण जागेवरच करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी कार्यालयामध्ये द्याव्यात तसेच शिबिरामध्येही आपले प्रश्न मांडावेत, कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी शिबिरात उपस्थित राहतील.
- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री