नागपूरच्या कुख्यात गुंडाच्या अकोल्यातील साथीदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:07 PM2020-02-08T12:07:16+5:302020-02-08T12:07:22+5:30
कृष्णा थोटांगे याला घेऊन नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी अकोल्यात आले होते.
अकोला: नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या अकोला आणि मुंबईतील दोन साथीदारांना नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी सापळा रचून अटक केली होती. अकोल्यातील त्याचा साथीदार कृष्णा थोटांगे याला घेऊन नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी अकोल्यात आले होते. या पथकाने थोटांगे याच्या घराची झाडाझडती घेतली. दरम्यान, त्याच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांच्या माहितीनुसार नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी, धमकी, भूखंडावरील ताबा घेणे व अत्याचारासह तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करून अटक केली होती. गुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकर, त्याचे दोन भाचे, मावस भाऊ, सराफा राजा अरमरकरसह १२ पेक्षा अधिक जणांना अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत; मात्र अकोल्यातील त्याचा साथीदार कृष्णा थोटांगे व मुंबईतील साथीदार जगन जगदाळे फरार होते. नागपूरच्या गुन्हे शाखा पथकाने ६ फेब्रुवारी रोजी कृष्णा थोटांगे याला अटक केली. शुक्रवारी पोलिसांनी त्याला अकोल्यात आणून त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या घरात महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. थोटांगे याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)