एड्स, सिकलसेल, हिमोफेलियाग्रस्तांनाही आता एसटीची मोफत प्रवासी सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:38 PM2019-01-21T15:38:19+5:302019-01-21T15:38:23+5:30
अकोला : कुष्ठरोग, कर्करोग व क्षयरोगग्रस्तांना बसमधून प्रवास करण्यासाठी आधीच सूट देण्यात आली आहे. त्यानंतर आता एड्स, सिकलसेल, डायलेसीस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना बस प्रवासात १०० टक्के मोफत प्रवासाची सूट देण्यात आली आहे.
अकोला : कुष्ठरोग, कर्करोग व क्षयरोगग्रस्तांना बसमधून प्रवास करण्यासाठी आधीच सूट देण्यात आली आहे. त्यानंतर आता एड्स, सिकलसेल, डायलेसीस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना बस प्रवासात १०० टक्के मोफत प्रवासाची सूट देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचा हा निर्णय रुग्णांसाठी समाधानकारक असून, मार्ग परिवहन महामंडळाने खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला आहे.
ग्रामीण भागातही गंभीर आजाराचे प्रमाण वाढले असून, त्यांना उपचाराच्या सुविधाही मिळणे कठीण होते. अशावेळी या रुग्णांना किमान प्रवास मोफत सवलत मिळाली, तरी ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतील, या उदात्त हेतूने राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ही सवलत जाहीर केली आहे. क्षयरोगग्रस्तांच्या प्रवासाच्या सवलतीत वाढ करून त्यांना दिलासा देण्यासोबतच इतर आजारी व्यक्तींनाही सवलत योजनेत बसविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने कुष्ठरोग, कर्करोग व क्षयरोगग्रस्तांना बस प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली होती. रुग्णाला महिन्यातून दोन वेळा गाव ते रुग्णालय अशी सुविधा या योजनेत होती; मात्र आता रुग्णांना दिलासा देणाºया योजनेची व्याप्ती वाढवून त्यात एड्स, सिकलसेल, डायलेसीस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन योजनेतंर्गत एड्स, सिकलसेल, डायलेसीस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना १०० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुविधेसाठी अटी घातल्या!
सिकलसेलग्रस्तांना १५० किमी, एड्सग्रस्तांना ५० किमी, डायलेसीस करणाºयांना १०० किमी आणि हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना १५० किमीचा प्रवास महिन्यातून दोन वेळा १०० टक्के मोफत करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक किंवा तत्सम वैद्यकीय अधिकाºयांचा दाखला असणे यासाठी आवश्यक आहे.