सर्वोपचारमधील वातानुकूलन यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर!
By admin | Published: April 17, 2017 02:09 AM2017-04-17T02:09:55+5:302017-04-17T02:09:55+5:30
अतिदक्षता विभागातील ‘एसी’ बंदच : कुलर बनले शोभेच्या वस्तू
अकोला : सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे दिवसेंदिवस तापमान वाढतच असून, गत काही दिवसांत पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. उष्म्याने सर्वसामान्यांच्या जीवाची काहिली होत असताना, सर्वोपचार रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा मात्र ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र आहे. अतिदक्षता विभागातील (आयसीयू) ९ पैकी ७ एसी बंद आहेत, तर अनेक वॉर्डांमधील कुलर हे केवळ शोभेच्या वस्तू म्हणून उभे असल्याने रुग्णांचे प्रचंड उकाळ्याने हाल होत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. सर्वोपचारमध्ये रुग्णांना उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी असलेली यंत्रणा मात्र कुचकामी ठरली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरातील तापमान प्रचंड वाढले आहे. गत दोन दिवसांपासून पारा ४४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे; परंतु सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात लावलेले वातानुकूलन यंत्र प्रचंड तापमानातही बंद आहेत. गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात येते. या ठिकाणी १२ खाटा असून, या ठिकाणी नऊ वातानुकूलन यंत्र लावलेले आहेत; परंतु यापैकी केवळ दोनच यंत्र सुरू आहेत. तापमान वाढत असल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी वातानुकूलन यंत्र आणि कुलर सुरू करायला हवे होते; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांना उकाड्यात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
उष्माघात कक्षातील कुलर बंद
उष्णतेची लाट असल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. ९ मध्ये उष्माघात कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना शीतलता मिळावी, यासाठी कुलरची व्यवस्था असणे अनिवार्य असते. सदर कक्षामध्ये कुलर आहे; परंतु रविवारी दुपारच्या सुमारास या कक्षात रुग्ण दाखल असतानाही कुलर बंद असल्याचे दिसून आले.
अनेक कुलरमध्ये पाणीच नाही!
सर्वोपचार रुग्णालयातील सर्वच कक्षांमध्ये कुलर बसविण्यात आले आहेत. रुग्णांना उष्म्याचा त्रास होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती कुचकामी ठरत आहे. बहुतांश कक्षांमधील कुलरमध्ये पाणीच नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी हे कुलर उष्ण हवा फेकत असल्यामुळे रुग्णांना त्याचा त्रासच होतो. कुलरमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी कक्ष सेवकांची आहे; परंतु मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे कुलरमध्ये पाणी भरल्या जात नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘आयसीयू’मधील वातानुकूलन यंत्रे वारंवार नादुरुस्त होतात. नवीन यंत्रे खरेदी करण्याचे अधिकार महाविद्यालय प्रशासनास नाहीत. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. कुलरमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी कक्ष सेवकांकडे आहे; मात्र मनुष्यबळाचा अभाव आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला