‘एसबीआय’ला हवा आर्थिक मोबदला; टॉवर रस्त्याचे काम ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:27 AM2017-08-12T02:27:18+5:302017-08-12T02:27:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका प्रशासनाने शहरातील सात सिमेंट रस्त्यांची कामे सुरु केल्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. रस्ता रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीची जागा हवी आहे. या जागेच्या बदल्यात बँकेने मागि तलेल्या आर्थिक मोबदल्याची रक्कम जास्त असल्यामुळे की काय, टॉवर चौक ते हॉटेल स्कायलार्कपर्यंत रस्त्याचे काम ठप्प झाल्याचे चित्र आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत २0१३ मध्ये अतवृष्टीने दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. प्राप्त निधीतून एकूण १८ रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली होती. यामध्ये प्रशासनाने सात सिमेंट काँक्रिटीकरणाचे, तर उर्वरित ११ डांबरीकरणाचे रस्ते प्रस्तावित केले होते. सिमेंट रस्त्यांमध्ये टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचा समावेश होता. या रस्त्याची रुंदी केवळ १८ फूट केली जाणार होती. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून टॉवर चौक-रतनलाल प्लॉट रस्त्याकडे पाहिल्या जाते. भविष्यात वाह तुकीची समस्या उद्भवणार हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सिमेंट रस्त्यांच्या ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करून ते ३८ ते ४0 फूट रूंद करण्याचा निर्णय घेतला. टॉवर चौकात रस्त्याची अरूंद जागा ध्यानात घेता रस्त्यालगतच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जागेचे भूसंपादन करण्यासाठी प्रशासन सरसावले.
रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारे व रस्त्याच्या मधोमध असलेले धार्मिक स्थळ हटविल्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होईल,अशी अपेक्षा होती; परंतु एसबीआयने जागा देण्याच्या बदल्या त आर्थिक रक्कम देण्याची मागणी करीत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही रक्कम जास्त असल्यामुळे प्रशासन तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
मनपाचा प्रस्ताव बाजूला सारला!
रस्ता रुंदीकरणासाठी मनपाला एसबीआय बँकेच्या जागेची गरज आहे. जागेच्या बदल्यात बँकेला टीडीआर देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. बँकेने हा प्रस्ताव तूर्तास बाजूला सारल्याची माहिती आहे.
उर्वरित काम नंतर होणार!
टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक रस्त्यावरील वाहतूक पाहता एसबीआयच्या जागेचा तिढा निकाली निघेपर्यंत या मार्गावर उपलब्ध असलेल्या रस्त्याचे बांधकाम केले जाईल. जागेचा तिढा निकाली निघाल्यानंतर रस्त्याच्या रूंदीकरणाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आहे.