अकोल्यात वायू प्रदूषण घटेना; २९ पैकी २४ दिवस प्रदूषित
By Atul.jaiswal | Published: February 29, 2024 07:30 PM2024-02-29T19:30:46+5:302024-02-29T19:31:12+5:30
या महिन्यात सूक्ष्म धूलिकणांचे प्रदूषण जास्त वाढले आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून अकोला शहरात वाढलेले वायू प्रदूषण कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, फेब्रुवारी महिनाही प्रदूषणाचाच ठरला. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) फेब्रुवारीच्या २९ पैकी २४ दिवस १०१ (सर्वसाधारण प्रदूषित) पेक्षा अधिकच राहिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या महिन्यात सूक्ष्म धूलिकणांचे प्रदूषण जास्त वाढले आहे.औद्योगिकीकरण व वाहनांची संख्या प्रचंड वाढलेल्या शहरांमध्ये वायू प्रदुषणाचा टक्का वाढला आहे. तथापी, अलिकडच्या काळात फारसे औद्योगिकीकरण न झालेल्या अकोल्यासारख्या शहरांमध्येही वायू प्रदूषण वाढीस लागले आहे. वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आदी अनेक कारणांमुळे उद्योग नसणाऱ्या शहरांची हवा प्रदूषित होत आहे. कमी तापमान व मंद वारे असताना धूळ आणि धूर जमिनीजवळ येतो यामुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) वाढतो. अकोला शहरातही हाच प्रकार घडत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रामदास पेठ स्थित केंद्राच्या आकडेवारीवरून लक्षात येते. फेब्रुवारी महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केलेल्या आकडेवारीनुसार शहरात २९ पैकी २४ दिवस प्रदूषण आढळले. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी धूलिकण, २.५, १०. ओझोन, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड या प्रदूषकांचा विचार केला जातो.
प्रदूषणाची कारणे
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे.