आयुक्तपदी अजय लहाने रुजू
By admin | Published: September 9, 2015 01:57 AM2015-09-09T01:57:53+5:302015-09-09T01:57:53+5:30
अकोला जिल्हाधिका-यांकडून स्वीकारला पदभार.
अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी अजय लहाने रुजू झाले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून लहाने यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. तत्पूर्वी, लहाने यांनी मनपात येऊन विभाग प्रमुखांसोबत चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला. लहाने यांच्या रोखठोक निर्णय घेण्याच्या कार्यशैलीबद्दल स्थानिक राजकारणी व मनपा अधिकार्यांना चांगलीच जाण असल्याने अनेकांच्या मनात धडकी भरल्याची चर्चा दिवसभर मनपा वतरुळात सुरू होती. मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांची अवघ्या सहा महिन्यातच (३१ ऑगस्ट) शासनाने कामठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली केली. यामुळे आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यादरम्यान, मनपाच्या आयुक्तपदी अमरावती येथील उपजिल्हाधिकारी (वन जमाबंदी) अजय लहाने यांच्या नियुक्तीचे आदेश ४ सप्टेंबर रोजी महसूल व वन विभागाने जारी केले. शासन दरबारी आस्थापना बदलीची प्रक्रिया पूर्ण होताच लहाने मंगळवारी (८ सप्टेंबर) महापालिकेत रुजू झाले. मनपात सकाळी सव्वादहा वाजता दाखल झालेल्या लहाने यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांसोबत विभागातील कामकाजाबाबत इत्थंभूत चर्चा करून आढावा घेतला. दुपारी १२ वाजता लहाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. दुपारी २ वाजतापासून पुन्हा मनपातील कामकाजाला सुरुवात केली.