कारागृहात स्थानबद्धतेचा अकाेला पॅटर्न अमरावती परिक्षेत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:38+5:302021-07-14T04:22:38+5:30
अकाेला : कुख्यात गुंड तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अकाेला पाेलिसांनी गत एका वर्षापासून राबविलेला एमपीडीए कारागृहात स्थानबद्ध ...
अकाेला : कुख्यात गुंड तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अकाेला पाेलिसांनी गत एका वर्षापासून राबविलेला एमपीडीए कारागृहात स्थानबद्ध करण्याचा पॅटर्न आता अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहीती आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकीशाेर मीना यांनी तशा सूचना संबंधित पाेलीस अधीक्षकांना दिल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षापासून अवैधरीत्या प्रतिबंध असलेला गाैरखधंदा चालविणाऱ्यांना वारंवार समजपत्र तसेच प्रतिबंधात्मक कारवाया अकाेला पाेलिसांनी त्यांच्यावर केल्या. मात्र या कारवायांना न जुमानता अनेकजन गाैरखधंदा सुरूच ठेवत असल्याने त्यांचे कंबरडे माेडण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एमपीडीए कारवाईचा सपाटा सुरू केला. यासाेबतच गुंडगिरी व खंडणी वसूल करणाऱ्यांवरही अशाच प्रकारे कारवाई करून या गुंडांना पळता भुई थाेडी केली. याचेच परिणाम म्हणूण जिल्ह्यातील अवैध धंद्याना ब्रेक लागले आहेत, तर गुंडगिरीचाही बऱ्याच प्रमाणात नायनाट झाल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ३१ पेक्षा अधिक टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर २९ पेक्षा अधिक जनांवर एमपीडीए कारवाई करून या आराेपींना मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांनी एका आठवड्यापूर्वी अकाेल्यात गुन्हे आढावा बैठक घेतली. त्यानंतर याच बैठकीत अकाेला पाेलिसांच्या एमपीडीए कारवाईचे काैतुक करीत हा पॅटर्न अमरावती परिक्षेत्रात राबविण्याच्या सूचना विशेष पाेलीस महानिरीक्षक मीना यांनी केल्या आहेत. त्यामुळे अकाेला पॅटर्ननुसार पाच जिल्ह्यात कारवायांना प्रारंभ झाल्याची माहिती आहे.
अकाेला राज्यात टाॅपवर
पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकाेल्यातील गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी पदभार स्वीकारताच कुख्यात गुंडावर एमपीडीए कारवाईचे अस्त्र उगारले. त्यामुळे अनेक कुख्यात टोळ्यांना जेरबंद करण्यात आले असून, काही टाेळ्यांना दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवायांमुळे अकाेला पाेलीस राज्यात टाॅपवर आहेत.
गुंडाचा मुक्काम अकाेल्याबाहेर
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना १० महिन्यांपूर्वी रुजू झाले. त्यापूर्वी काही दिवसाआधीच अकाेला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारला. मीना यांचा अकाेल्यातील गुंडांवर असलेला वचक आणि जी. श्रीधर यांनी केलेल्या कारवायांमुळे अकाेल्यातील बहुतांश गुंडांनी त्यांचे बस्तान अकाेल्याच्याबाहेर हलविल्याची माहिती आहे.