अकाेलेकर बेफिकीर; ३४६ जण काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:28+5:302021-03-13T04:34:28+5:30
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने काेराेना ...
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. परिणामी शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांनी चाचणीसाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. यादरम्यान, काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड दिसून येत आहे. शहरात दरराेज किमान २०० ते ३०० पेक्षा अधिक रुग्ण काेराेना बाधित आढळून येत असतानाही अकाेलेकर प्रचंड बेफिकीर असल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या जीवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे, याची जाणीव असतानाही नागरिक, युवा वर्गाकडून नियमांचे पालन केले जात नसल्याची स्थिती आहे. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीचे परिणाम समाेर येत असून काेराेनाची बाधा हाेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पुन्हा अहवालाअंती शुक्रवारी समाेर आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून महापालिका क्षेत्रातील तब्बल ३४६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे मनपाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पूर्व, दक्षिण झाेन सर्वात पुढे
शहरात काेराेना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढल्याचे प्रकर्षाने समाेर येत आहे. जिल्हा प्रशासनाने १५ फेब्रुवारी राेजी जमावबंदीचा आदेश केला. त्या कालावधीपासून ते आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. शुक्रवारीदेखील पूर्व झोनमध्ये काेराेनाचे १०२ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ५३ उत्तर झोनमध्ये ३५ व दक्षिण झोनमध्ये सर्वात जास्त १५६ असे एकूण ३४६ रुग्ण आढळून आले आहेत.
अकाेलेकरांचा आरटीपीसीआरकडे ओढा
काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी शुक्रवारी रॅपिड ॲन्टिजेन चाचणीपेक्षा आरटीपीसीआर चाचणीला प्राधान्य दिल्याचे समाेर आले. ५५२ जणांनी ही चाचणी केली असून ४४४ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली.