अकाेलेकरांवर माेकाट श्वान पकडण्याची पाळी; मनपाचे वाहन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:24+5:302020-12-13T04:33:24+5:30
शहरवासीयांना मुलभूत सुविधांची पूर्तता करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असून, आजराेजी काेट्यवधींच्या थकीत देयकांना अदा करण्याकडे प्रशासनाचा ‘इन्ट्ररेस्ट’असल्याचे दिसत आहे. ...
शहरवासीयांना मुलभूत सुविधांची पूर्तता करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असून, आजराेजी काेट्यवधींच्या थकीत देयकांना अदा करण्याकडे प्रशासनाचा ‘इन्ट्ररेस्ट’असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय कारभारावर झाला असून, विभागप्रमुखांनीही हात आखडता घेतल्याची परिस्थिती आहे. साहजिकच, सर्वसामान्य अकाेलेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेण्याकडे प्रशासनाने कानाडाेळा केल्याचे दिसत आहे. शहरात माेकाट श्वानांच्या संख्येत माेठी वाढ झाली असून, अशा श्वानांचा बंदाेबस्त न करता काेंडवाडा विभागाने झाेपेचे साेंग घेतले आहे. लहान मुले, वयाेवृद्ध नागरिक व रात्री घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी भटके श्वान डाेकेदुखी ठरू लागले आहेत. प्रभागात पिसाळलेल्या किंवा माेकाट श्वानांचा बंदाेबस्त करण्यासाठी काेंडवाडा विभागाशी संपर्क साधल्यानंतर या विभागातील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे.
पिसाळलेल्या श्वानाचा केला बंदाेबस्त
जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये पिसाळलेल्या श्वानामुळे परिसरातील लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. काेंडवाडा विभागाशी संपर्क साधल्यावरही वाहन येत नसल्याचे पाहून नागरिकांनीच पिसाळलेल्या श्वानाला पकडून शहराबाहेर साेडून दिले.
आयुक्त साहेब या विभागाकडे दुर्लक्ष का?
भटक्या श्वानांचा बंदाेबस्त करण्याचा कंत्राट गाेमाशे नामक व्यक्तीला दिला आहे. मागील चार महिन्यांपासून कंत्राटदाराने श्वान पकडण्याचे काम बंद केल्याची माहिती आहे. शहरातील काेंडवाडे रिकामे असून, जनावरे रस्त्यावर दिसून येतात. नागरिकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला असताना आयुक्त साहेब या विभागाकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
प्रभागात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून, याविषयी मनपा प्रशासनाला अनेकदा सूचित केले. अखेर नाईलाजाने नागरिकांवरच श्वानांचा बंदाेबस्त करण्याची वेळ आली. प्रशासकीय कारभार लयास गेल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- मंजूषा शेळके, नगरसेविका, प्रभाग क्र. १०