अकोल्यात अक्षयतृतीयेला सराफा बाजारात पाच कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:39 PM2018-04-19T14:39:43+5:302018-04-19T14:39:43+5:30
अकोला : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अकोलेकरांनी बुधवारी पाच कोटी रुपयांची खरेदी केली.
अकोला : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अकोलेकरांनी बुधवारी पाच कोटी रुपयांची खरेदी केली. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता होती. मात्र, ३१६०० प्रतिग्रॅमचे भाव कायम राहिले. सकाळपेक्षा बुधवारी सायंकाळी सोने खरेदीसाठी अकोलेकर बाहेर पडलेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अकोला सराफा बाजारात तेजी होती.
दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्ताला सोन्याची खरेदी शुभ समजली जाते. त्यामुळे या साडेतीन मुहूर्तावर देशभरात मोठी उलाढाल होते. अकोल्यातही कोटींच्या घरात सोन्याची एका दिवसात उलाढाल होत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सराफा बाजार आधीच मंगळवारपासून सज्ज होता. दागिन्यांची रेंज, नाणी, मूर्ती यांना जास्त पसंती असल्याने अकोल्यातील सुवर्णकार आणि सराफांनी पसंतीचे दागिने मुबलक प्रमाणात ठेवले होते. मुंबई आणि अकोल्याच्या सोन्याच्या भावात अनेकांना तफावत जाणवली. याबाबत एका ज्वेलरी संचालकास विचारणा केली असता ३१६०० सह मेकिंग आणि जीएसटी चार्ज वेगळा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील आठवड्यात सोन्याचे भाव ३०,८०० रुपये प्रतिग्रॅम होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यवहारामुळे सोन्याचे भाव वधारलेले होते. पण, त्याचा खरेदीदारावर कोणताही परिणाम दिसून आला नाही.