मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अकोटच्या ‘जेनी’ची दहशत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:58 AM2018-02-05T00:58:19+5:302018-02-05T00:58:41+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शिकार, चोरी व इतर अवैध व्यवसाय करणार्या शिकार्यांची शिकार करणार्या जेनीची चांगलीच दहशत आहे. अकोट वन्य जीव विभागात कार्यरत असलेल्या डॉग स्क्वॉडमधील जेनीने आतापर्यंत अनेक प्रकरणाचा छडा लावला असून, आठ प्रकरणांत १५ आरोपींना जेरबंद करण्याकरिता मोलाची भूमिका बजावली आहे.
विजय शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शिकार, चोरी व इतर अवैध व्यवसाय करणार्या शिकार्यांची शिकार करणार्या जेनीची चांगलीच दहशत आहे. अकोट वन्य जीव विभागात कार्यरत असलेल्या डॉग स्क्वॉडमधील जेनीने आतापर्यंत अनेक प्रकरणाचा छडा लावला असून, आठ प्रकरणांत १५ आरोपींना जेरबंद करण्याकरिता मोलाची भूमिका बजावली आहे.
वन्य जीव व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संरक्षणाकरिता गत तीन वर्षांपासून जेनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहे. पोलीस विभागाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट, शिपना, गुगामल या वन्य जीव विभागासाठी एक डॉग स्क्वॉड कार्यरत आहे. त्यांचे मुख्यालय अकोट वन्य जीव विभागाच्या मोबाइल स्क्वॉडमध्ये आहे.
पाच वर्षांची अल्सेसियन जातीची मादी असलेली जेनी (श्वान) ही मेळघाटमधील अतिदुर्गम जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करणार्यांना सळो की पळो करून सोडत आहे. जेनीचे प्रशिक्षण भोपाळच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये झाले आहे. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांच्या अखत्यारित असलेल्या तीन वन्य जीव विभागात जुलै २0१५ पासून जेनी कर्तव्यावर आहे. तिने तीन वर्षात उत्तम कामगिरी केली असून, १८ प्रकरणांमध्ये जेनीचा सहभाग होता. त्यापैकी आठ प्रकरणात तिने १५ आरोपींना जेरबंद करण्यात मोलाची कामगिरी केली आहे. सांबार शिकार प्रकरणात नऊ आरोपी, अस्वल शिकार, चंदन वृक्ष चोर, बैरागड - परतवाडा आदी विविध ठिकाणी तिने आरोपींचा सुगावा दिला आहे. जेनीला हाताळण्याकरिता अकोट येथील मोबाइल स्क्वॉडचे प्रशिक्षक वनरक्षक आतीक हुसेन आणि आकाश सारडा अधिकाधिक प्रशिक्षित करीत आहेत. जेनी हिचा दरमहा १0 हजार रुपये खर्च होत असून, दररोज ३ कि.मी. धावणे, सर्च ऑपरेशनचे प्रात्यक्षिक आदींसह विविध वन विभागाच्या कार्यात जंगलात हिरीरीने सहभागी होते. मोबाइल स्क्वॉडचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया यांच्या अधिनस्थ असलेले वनरक्षक आतिक हुसेन हे तिची देखभाल करत आहेत. सध्या जेनीची व्याघ्र प्रकल्पात प्रचंड दहशत असून, चोरट्यांचा सुगावा लावण्यात ती तरबेज ठरत असल्याने शिकारी व वनसंपदा चोरींच्या घटनांना आळा घालण्यात तिची मदत होत आहे.
वाघाचे अवयव जेनीने शोधले!
अकोट वन्य जीव विभागाच्या सोनाळा परिक्षेत्रात परिसर अधिवास क्षेत्रावरून दोन वाघांची झुंज झाली होती. त्यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाला होता. दुसर्या वाघाने मृतावस्थेत पडलेल्या वाघाचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी लपविलेले होते. हे अवयव शोधण्याचे काम जेनीने यशस्वीपणे पार पाडल्याने तपासात मोठी मदत झाली होती.