अकोला : १३ महिन्यात अपघाताचे १७३ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:35 PM2020-02-19T13:35:23+5:302020-02-19T13:35:40+5:30
गत तेरा महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ५२२ अपघात झाले असून, यात १७३ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर १३१ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- नितीन गव्हाळे
अकोला: वापरा शिरस्त्राण नाही तर जातील प्राण, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहने सावकाश चालवा,यांसारखे संदेश देणारे फलक रस्त्यांवर जागोजागी दिसतात; परंतु त्याचा वाहनचालकांवर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसते. गत तेरा महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ५२२ अपघात झाले असून, यात १७३ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर १३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. सरासरीनुसार जिल्ह्यात दिवसाला चार अपघात होत असल्याचे दिसून येते. खड्डे पडलेले रस्ते, नियमांचे उल्लंघन, मद्यसेवन, विना हेल्मेट वाहन चालविणे, अति घाई यासारखी कारणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
ही आहेत अपघातप्रवण स्थळे
पातूर रोड, बाळापूर रोड, अकोट रोड, निंबा फाटा ते तेल्हारा रोड आणि शहरातील अप्पू टी पॉर्इंट, शिवर टी पॉर्इंट, डाबकी रेल्वेगेट, खडकी नाका, बाभूळगाव या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने दिली. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळेही अपघात घडत आहेत.
हेल्मेट सक्तीला ‘खो’!
हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर इजा होऊन अनेकांचा बळी गेला आहे. काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. सातत्याने वाहतूक नियमांविषयी जनजागृती करूनसुद्धा वाहनचालकांमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करतात. परवानेसुद्धा रद्द करतात. त्यानंतरही कोणताही फरक दिसून येत नाही.
अल्पवयीन वाहन चालक सुसाट...
जिल्हाभरात महाविद्यालयीन व शिकवणी वर्गाला जाणारे अल्पवयीन वाहनचालकांचा सुळसुळाट आहे. परवाना नसतानाही भरधाव वाहने चालवितात. वाहन चालविण्यासाठी त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता नसतानाही पाल्यांच्या हाती पालक वाहनाची चावी देतात. ही मुले सुसाट वेगाने दुचाकी दामटताना दिसून येतात. त्यामुळे पालकांनी सतर्क व्हावे.
वाहनचालकांनी वाहने चालविताना, हेल्मेट, सिटबेल्टचा वापर केल्यास अपघाताच्या घटना कमी होऊ शकतात; तसेच वाहनाच्या वेगाला मर्यादा घालाव्यात. रिफ्लेक्टर्सचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांना ब्रेक लागेल.
-गजानन शेळके, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा