Akola: अकोला जिल्ह्यात १.७८ लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘पी.एम. किसान’चा हफ्ता
By रवी दामोदर | Published: July 26, 2023 04:49 PM2023-07-26T16:49:21+5:302023-07-26T16:49:54+5:30
Akola: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो.
- रवी दामोदर
अकोला - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १३ हफ्ते जमा झाले असून, १४ व्या हफ्त्याचे वितरण गुरुवार, दि. २६ जूलैपासून सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील मॅसेज संबंधित शेतकऱ्यांना प्राप्त झाले असून, जिल्ह्यात १ लाख ७८ हजार २८४ शेतकऱ्यांच्या खात्यात १४ हफ्ता जमा होणार आहे.
पी.एम. किसान योजनेंतर्गत जिल्हाभरात २ लाख १२ हजार ७४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इ-केवायसी पूर्ण झालेली असलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हफ्त्यांची मदत मिळाली आहे. पी.एम. किसान योजनेचा १४ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथून वितरित करण्यात येणार आहे. ई-केवायसी अद्याप झालेले नाही, असे शेतकरी १४ व्या हफ्त्याला मुकणार आहेत.
३४ हजार ४६१ शेतकरी हफ्त्याला मुकणार
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत १३ हप्ते पात्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. चौदावा हप्ता देण्यासाठी लाभार्थांना ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करणे गरजेचे होते. जिल्ह्यात ३४ हजार ४६१ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी असल्याने त्या शेतकऱ्यांना चौदावा हफ्ता मिळणार नाही.
महिनाभरात १७ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दिला जाणारा हप्ता मिळण्यात अडचण येत होती. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम, शिबिरे राबवून ई-केवायसीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. परिणामी गत महिन्याभरात १६ हजार ९५३ लाभार्थींची ई-केवायसी पूर्ण करण्यात यश आले.