लसीकरणाच्या यादीत ४० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची नावेच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:52 AM2021-02-18T10:52:19+5:302021-02-18T10:52:25+5:30
Corona Vaccine पात्र असूनही यादीत नाव नसल्याने लस मिळू शकली नाही, अशी खंत आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
अकोला : जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधील लोटला असून, अद्यापही ४० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे कोविन ॲपमध्ये समाविष्ट झाली नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश अजूनही ॲपमध्ये झाला नाही. त्यामुळे पात्र असूनही यादीत नाव नसल्याने लस मिळू शकली नाही, अशी खंत आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
कोविड लसीला मान्यता मिळाल्यानंतर ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात याच कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. तत्पूर्वी आरोग्य विभागातील सर्वच पात्र कर्मचाऱ्यांची कोविन ॲपमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून माहितीदेखील मागविण्यात आली होती. लसीकरणाला सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला; मात्र अजूनही जवळपास ४० टक्के कर्मचाऱ्यांची नावे कोविन ॲपमध्ये समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे अद्यापही या कर्मचाऱ्यांंना लस मिळू शकली नाही. जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत इतरांसोबतच उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळणे अपेक्षित आहे.
२० दिवसांपासून कोविन ॲपचा गोंधळ
कोविड लसीकरण मोहिमेसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे. मागील २० दिवसांपासून ही तांत्रिक अडचण सुरू असल्याची माहिती आहे. कोविन लसीसाठी पात्र ठरल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती संबंधित यंत्रणेला दिली. परंतु, लसीकरणाच्या लाभार्थी यादीत अद्यापही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढला कोविडचा धोका
जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही आरोग्य विभागातील कर्मचारी रुग्णसेवा देत आहेत. असे असतानाही आतापर्यंत अनेकजणांना लस मिळाली नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे चित्र दिसून येते.