अकोला : ४३९ विद्यार्थ्यांनी दिली विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:47 PM2019-09-16T13:47:06+5:302019-09-16T13:47:22+5:30
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरतर्फे आयोजित विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, १५ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे घेण्यात आली.
अकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरतर्फे आयोजित विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, १५ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे घेण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातील ४३९ निवडक विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील बालवैज्ञानिक, नवनर्मिती समस्या निराकरण आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञान लालसेला चालना मिळावी, या उद्देशाने दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. एन.टी.एस. परीक्षेची पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी प्रत्येक विद्यालयातील प्रज्ञावंत विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरतात. या प्रवेशपूर्व परीक्षेमधून गुणवत्तेनुसार ग्रामीण भागातील ४० व शहरी भागातील ३० विद्यार्थ्यांची निवड विज्ञान मंच शिबिरासाठी केली जाते. निवड झालेल्या प्रतिभावंत बाल वैज्ञानिकांना विज्ञानातील व्याख्याने, प्रयोग दिग्दर्शन प्रश्नमंजूषा, अपूर्व विज्ञान मेळावा, वैज्ञानिकांची भेट व चर्चा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. यावर्षी जिल्ह्यातून ४३९ निवडक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यामध्ये अकोट व तेल्हारा तालुक्यातून लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय, अकोट या केंद्रावर ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला या तालुक्यातील ३२४ विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला या केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षेवेळी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दिनेश तरोळे, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बळीराम झामरे, सचिव दिनेश तायडे, प्राचार्य माधव मुनशी, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्र संचालक अंजली दंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गजानन निमकर्डे, मनीष निखाडे, ओरा चक्रे, शशिकांत बांगर, सुरेश किरतकर, संतोष जाधव, मुरलीधर थोरात, सुनील वावगे, मनोज तायडे, विलास कयले, श्रीकांत रत्नपारखी, मनोज वाकोडे, मंजुश्री लव्हाळे, रसिका जयस्वाल, वैशाली ढबाले, किरण राठोड, दीपिका आगरकर, रसिका मोहरील, सचिन ताडे, जयश्री भदे, सचिन वारकरी, कविता इंगळे यांच्यासह विज्ञान अध्यापक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.