अकोला : ४७ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:43 PM2018-01-17T23:43:10+5:302018-01-17T23:47:20+5:30
अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बाश्रीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बार्शीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. महिलेवर झालेल्या अत्याचाराचे घटनास्थळ बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दधम शेतशिवार असल्याने खदान पोलिसांनी हे प्रकरण बाळापूर पोलिसांकडे वर्ग केले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकामागील परिसरात रहिवासी असलेली ४७ वर्षीय महिला रोजप्रमाणे घरच्या गुरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेली होती.
यावेळी बार्शीटाकळी येथील रहिवासी सय्यद बिलाल सय्यद मेहबूब व सागर ऊर्फ अविनाश वैराळे या दोघांना ही महिला दिसली. त्यांनी महिलेला शेतातील चारा देण्याचे आमिष देत तिला दुचाकीवर दधम शेतशिवारात घेऊन गेले. या ठिकाणी त्यांनी महिलेवर शारीरिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही या दोघांनी महिलेला दिली. त्यामुळे महिलेने या प्रकरणाची वाच्यता केली नाही.
मात्र, पत्नी चिंतेत असल्याचे पतीच्या लक्षात येताच, त्याने पत्नीला विचारणा केली, असता पत्नीने घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघेही खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, महिलेसोबत घडलेला प्रकार तिने खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांना सांगितला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी खदान पोलीस स्टेशन गाठले.
या दोन्ही आरोपींवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी सय्यद बिलाल व अविनाश वैराळे या दोघांना अटक केली. घटनास्थळ बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने झीरोची नोंद करून प्रकरण बाळापूर पोलिसांकडे वर्ग केले.
सय्यद बिलाल आरोपी
या प्रकरणातील सय्यद बिलाल याच्यावर यापूर्वीही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर अविनाश वैराळे हा वाहन दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलीस जप्त करणार आहेत. सय्यद बिलाल व अविनाश वैराळे या दोघांनीही अत्याचार केल्यानंतर पिडीत महिलेला फोन आल्यावर त्यांनी महिलेजवळील मोबाइल हिसकावून तो बंद करून पुन्हा कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.